Aurangabad | माझ्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रावर औरंगाबादच असेल, खा. जलील यांचं वक्तव्य, सर्वपक्षांची एकजूट, जनआंदोलन उभारणार
सुभेदारी विश्रामगृहावर औरंगाबादमधील विविध पक्षांचे नेते, संघटनांपदाधिकारी, औरंगाबादप्रेमी, इतिहास तज्ज्ञ यांनी काल आपलं म्हणणं मांडलं.
औरंगाबादः महाविकास आघाडातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने औरंगाबादचं संभाजीनगर (Sambhajinagar) नामांतर करण्याच्या ठरावाला मंजुरी तर दिली. मात्र यावरून हजारो औरंगाबादकरांची मनं दुखावली आहेत. या निर्णयाच्या विरोधात मंगळवारी सुभेदारी विश्रामगृह येथे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते नामांतराविरोधात मोठं जनआंदोलन उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. नामांतराला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती पुढील आंदोलनाची दिशा ठरवेल, अशी घोषणा खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केली. यासाठी कोणाही आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा कायदेशीर आणि रस्त्यावरील लढा देण्याची तयारी नेत्यांनी दर्शवली. लवकरच पुढील रणनीती ठरवली जाईल, असं खा. इम्तियाज जलील यांनी सांगितलं. या बैठकीला इतिहास तज्ज्ञ डॉ. रमजान शेख, माजी महापौर रशीद मामू, माजी नगरसेवक अफसर खान, एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी, जनता दलाचे अजमल खान, काँग्रेसचे डॉ. पवन डोंगरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर बकले, योगेश बन, रिपब्लिकनचे किशोर थोरात काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, पवन डोंगरे, फेरोज खान, एजाज झैदी, किशोर थोरात आदींची उपस्थिती होती.
‘जन्म-मृत्यू प्रमाणपत्रावर औरंगाबादच असेल’
सुभेदारी विश्रामगृहावर औरंगाबादमधील विविध पक्षांचे नेते, संघटनांपदाधिकारी, औरंगाबादप्रेमी, इतिहास तज्ज्ञ यांनी काल आपलं म्हणणं मांडलं. सर्वात शेवटी खा. जलील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हाले, संभाजी महाराजांबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे. नामांतर हा विषय हिंदू-मुस्लिम असा अजिबात नाही. शहरावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी हा विषय जिव्हाळ्याचा आहे. माझ्या जन्म प्रमाणपत्रावर औरंगाबाद आहे. तर मृत्यू प्रमाणपत्रावरही औरंगाबादच पाहिजे. आपली ताकद दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे का, असा सवाल खा. जलील यांनी केला. यावर उपस्थितांनी हात उंचावून सहमती दर्शवली.
कायदेशीर लढा देणार
या बैठकीला उपस्थित काँग्रेसचे डॉ. पवन डोंगरे म्हणाले, शहराला 350 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. प्रत्येक शहरवासियाचे औरंगाबाद या नावाशी नाते जोडलेले आहे. म्हणून संभाजीनगरविरुद्ध कायदेशीर लढाई लढावी लागेल. तर लोकांच्या भावना जाणून न घेता केलेल्या नामांतराला आमचा विरोध आहे. ही औरंगाबादच्या अस्मितेची लढाई आहे, असं वक्तव्य रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष माजी उपमहापौर किशोर थोरात म्हणाले. आजच्या राजकारणात कोण किती मोठा हिंदुत्ववादी आहे, हे दाखवण्याच्या स्पर्धेतून नामांतराचा खेळ खेळला जात आहे, असा आरोप कम्युनिस्ट नेते, अश्फाक सलामी यांनी केला.