Aurangabad | औरंगाबादेत उद्धव ठाकरेंच्या सभेची मनपाला काळजी!!! अनधिकृत नळतोडणी मोहीमेला तूर्तास ब्रेक
ही कारवाई झाली तर संबंधित भागातील लोकांचा रोष ओढवू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या सभेवरही त्याचे पडसाद उमटू शकतात. म्हणून मनपाने सध्या तरी परिस्थिती जैसे थे ठेवण्याची भूमिका घेतली आहे.
औरंगाबादः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आगामी सभेची चांगलीच काळजी महापालिका (Aurangabad municipal corporation) प्रशासन घेत असल्याचं चित्र सध्या शहरात आहे. शहरातील अनधिकृत नळजोडण्यांवर कठोर कारवाईची मोहीम काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेनं हाती घेतली होती. त्यानुसार, शहरातील विविध भागात मनपाच्या पथकानं (Special team) पाहणी करून अवैध नळांची नोंदही घेतली. आता या नळांचं कनेक्शन कापण्याची मोहीम राबवली जाणार होती. मात्र असे केल्यास संबंधित रहिवाशांचा रोष ओढवू शकतो. याचा परिणाम 08 जून रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर होऊ शकतो. त्यामुळे ही मोहिमच मनपाच्या वतीने तूर्तास थांबवण्यात आल्याचं दिसून येतंय. अर्थात मनपाचे अधिकारी याविषयी उघड बोलत नसले तरीही पूरेसा पोलिस बंदोबस्त नसल्याचे कारण देण्यात येत आहे.
शहरात दीड लाख अधिकृत नळ
औरंगाबाद शहरात सध्या दीड लाख अधिकृत नळ आहेत. त्यापेक्षा जास्त अनधिकृत नळ असल्याची माहिती मनपाला मिळाली आहे. अगदी झोपडपट्टी ते उच्चभ्रू कॉलन्यांमध्येही सर्रास अनधिकृत नळ कनेक्शन घेतलेले दिसून आले आहे. यातूनच पाण्याची मोठी चोरी होती. शहरातील पाणी टंचाईसाठीचं हेसुद्धा एक मोठं कारण असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे राजकीय नेते, कार्यकर्ते आणि मनपा कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे अद्याप यावर कारवाई झालेली नाही.
भाजपाच्या मोर्चानंतर मनपाची मोहीम
दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादकरांच्या पाणी संघर्षाला वाचा फोडण्यासाठी मोठा जलाक्रोश मोर्चा काढला. त्या आधीही नागरिकांनी विस्कळीत पाणीपुरवठ्याविरोधात तीव्र आंदोलन केलं होतं. या सर्वांचा परिणाम म्हणून मनपाने अवैध पाणी गळती किंवा चोरी कुठे होते, हे शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. मनपा प्रशासकांनी मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन केले होते. या पथकाने पहाडसिंगपुरा, लक्ष्मी कॉलनी, शांतीपुरा, शहानूरमियाँ दर्गा, पडेगाव या भागात पाणी केली. या पाचच वसाहतीत 2000 अनधिकृत नळ दिसले.
पाच वस्त्यांत 2000 अनधिकृत नळ
शहरातील पहाडसिंह पुरा भागात 1200, पडेगाव, शहानूरमियाँ दर्गा पररिसरात 600 अनधिकृत नळ आहेत. हे कापण्याची मोहीम राबवणार असल्याचं दोनही वेळा सांगण्यात आलं. मात्र पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याचं कारण देत मनपाने ही मोहीम लांबवली. उद्धव ठाकरे यांची येत्या 08 जून रोजी औरंगाबादेत सभा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई झाली तर संबंधित भागातील लोकांचा रोष ओढवू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या सभेवरही त्याचे पडसाद उमटू शकतात. म्हणून मनपाने सध्या तरी परिस्थिती जैसे थे ठेवण्याची भूमिका घेतली आहे.