Aurangabad | जागतिक सायकल दिनानिमित्त औरंगाबादेत उद्या सायकल रॅलीचं आयोजन, कुठे करणार नोंदणी? कसा आहे मार्ग?
कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने रेस टू झिरो मोहिमेसाठी वचनबद्ध असलेल्या औरंगाबाद स्मार्ट सिटी आणि औरंगाबाद महानगरपालिकेने जागतिक सायकल दिनानिमित्त ‘स्मार्ट रोड’ या थीमवर सायकल रॅली काढण्याची योजना आखली आहे.
औरंगाबादः संयुक्त राष्ट्रसंघाने 3 जून हा जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी यांच्या वतीने सायकल रॅलीचं (Cycle rally) आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीत शहरातील सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय (Astik kumar Pandey) यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक सायकल दिन सायकल वापरण्याच्या फायद्यांकडे लक्ष वेधतो. सायकल हे एक साधे, परवडणारे, स्वच्छ आणि पर्यावरणास (Environment) अनुकूल टिकाऊ वाहतुकीचे साधन आहे. हीच बाब समोर ठेवून औरंगाबाद स्मार्ट सिटीने सायकल चालवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल रॅली चे आयोजन केले आहे.
सायकल रॅलीचा मार्ग काय?
3 जून रोजी सकाळी 6 वाजता या रॅलीची सुरुवात होईल. सेव्हन हिल्स फ्लायओव्हर मार्गे सेव्हन हिल्स – सिडको बस स्टँड – एपीआय कॉर्नर – प्रोझोन- न्यू स्मार्ट सिटी सायकल ट्रॅक- वोक्हार्ट, आंबेडकर नगर चौक, ग्रामीण पोलिस मुख्यालय, टीव्ही सेंटर, न्यू स्मार्ट सिटी वॉकिंग आणि सायकलिंग ट्रॅक, एएमसी सायकल ट्रॅक- जिल्हाधिकारी कार्यालय- रंगीन दरवाजा – नवीन स्मार्ट सिटी कार्यालय असा या रॅलीचा मार्ग असेल. स्मार्ट सिटी कार्यालयावर समारोप झाल्यावर तेथे एक छोटा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कुठे करणार नोंदणी?
या रॅलीत सहभागी होण्यासाठी http://www.bit.ly.abadcyclerally.com या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करता येईल. यात सहभागी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच सहभागी होणाऱ्या सर्व सायकलस्वारांना प्ले स्टोअरवरुन स्ट्रावा (Strava) अॅप्लीकेशन डाउनलोड करून आपल्या प्रगती नोंद करावयाची आहे. आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून क्रीडा मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय आणि सरकारचे शहरी विकास विभाग महाराष्ट्र जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली, वाहनमुक्त रस्ते, ज्ञानाची देवाणघेवाण अशा विविध उपक्रमांना प्रोत्साहन आणि सुविधा देत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने रेस टू झिरो मोहिमेसाठी वचनबद्ध असलेल्या औरंगाबाद स्मार्ट सिटी आणि औरंगाबाद महानगरपालिकेने जागतिक सायकल दिनानिमित्त ‘स्मार्ट रोड’ या थीमवर सायकल रॅली काढण्याची योजना आखली आहे. 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या भारताच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी या रॅलीमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची विनंती औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे करण्यात येत आहे.