नोकरीवरून काढताच मालकाला लुबाडण्याचं षड्यंत्र, 24 लाख रुपये बँकेतून काढण्याचा डाव, औरंगाबादेतील घटना!
12 जानेवारी रोजी सक्करवार यांना बँकेकडून 24 लाख रुपयांचा धनादेश वटण्यासाठी टाकल्याचा मेसेज आला. सुदैवाने त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो धनादेश वटला नसल्याचे बँकेने स्पष्ट केले. माफी दिल्यानंतर बाबासाहेबने अशी फसवणूक केल्याचे पाहून अखेर सक्करवार यांनी पोलीसांकडे तक्रार केली.
औरंगाबादः पंधरा वर्ष नोकरी केल्यानंतर दगाफटका केलेल्या एका कर्मचाऱ्याला (Aurangabad crime) मालकानं नोकरीवरून काढलं. मात्र नोकरीवरून काढून टाकल्यानंतरही कर्मचाऱ्याने मालकालाच लुबाडण्याचा डाव आखला. कंपनीचा तब्बल 24 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने या गैरव्यवहाराचा चेक वठला नाही आणि मालकाचे 24 लाख रुपये वाचले. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विजय सक्करवार यांनी तक्रार दाखल केली असून औरंगाबादमधील वेदांत नगर पोलीस ठाण्यात बाबासाहेब डुकरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Aurangabad police) केलेल्या चौकशीनुसार, सदर व्यक्ती मागील पंधरा वर्षांपासून व्यावसायिकाकडे नोकरीला होता. मात्र पैशांची हेराफेरी (Fraud) केल्यावरून त्याला काही दिवसांपूर्वी काढून टाकण्यात आले होते.
काय आहे नेमकी घटना?
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्करवार यांच्याकडे पंधरा वर्षांपासून बाबासाहेब बाळासाहेब डुकरे हा हिशेबनीस म्हणून कामाला होता. सक्करवार यांच्या बांधकामाचा व्यवसाय आहे. या व्यवसायाशी संबंधित हिशेबाची कागदपत्रे तयार करणे, ग्राहकांकडून पैसे घेणे, त्या पैशांच्या नोंदी ठेवणे, पावत्या देणे, फ्लॅट-दुकाने, रोहाऊस विक्रीबाबतची कागदपत्रे तयार करणे, संस्थेने विकत घेतलेल्या बांधकाम सागित्याचे आलेल्या बिलाप्रमाणे धनादेश तयार करणे, अशी सर्व कामे बाबासाहेब करत होता. त्यामुळे अनेक वर्षांपासून चोख काम करत असल्यामुळे सक्करवार यांचा तो अत्यंत विश्वासू कर्मचारी होता. याच विश्वासामुळे ते बाबासाहेब याच्याकडे कोऱ्या धनादेशावर सह्या करून ठेवत होते. बाबासाहेबने त्याचाच गैरफायदा घेत मोठी अफरातफर केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सक्करवार यांनी बाबासाहेबला जाब विचारला. त्याने चूक कबूलही केली. मात्र मार्च 2019 मध्ये त्यांनी बाबासाहेब याला काढून टाकले.
अचानक बँकेचा आला मेसेज
सक्करवार यांनी सदर कर्मचाऱ्याला काढून टाकले, मात्र पोलिसात तक्रार देऊ नका, अशी विनवण्या त्याने केल्या. त्यामुळे त्यावेळी तक्रार दाखल करण्यात आली नाही. मात्र 12 जानेवारी रोजी सक्करवार यांना बँकेकडून 24 लाख रुपयांचा धनादेश वटण्यासाठी टाकल्याचा मेसेज आला. सुदैवाने त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो धनादेश वटला नसल्याचे बँकेने स्पष्ट केले. माफी दिल्यानंतर बाबासाहेबने अशी फसवणूक केल्याचे पाहून अखेर सक्करवार यांनी पोलीसांकडे तक्रार केली.
इतर बातम्या-
VIDEO : ट्रेनबाहेर मुली करत होत्या डान्स, TTEची प्रतिक्रिया पाहून नेटकरी म्हणाले, हा असा पळाला की त्याच्या समोर कोरोनाच नाचतोय!
VIDEO : डान्समध्ये स्टंट दाखवणे मुलांना पडले महागात, पाहा खतरनाक व्हिडीओ!