Aurangabad | प्रसिद्ध ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराचा गाभा 1 मार्चपासून खुला होणार, महाशिवरात्रीपासून दर्शनावरील निर्बंध हटणार
घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना येत्या 1 मार्चपासून गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन घेता येणार असले तरीही कोरोना प्रतिबंधक लसीच्या नियमांचे पालन भाविकांना करावे लागणार आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जावा, अशा सक्तीच्या सूचना जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिल्या आहेत.
औरंगाबादः कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) तब्बल 23 महिन्यांपासून बंद असलेल्या वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिराचा गाभारा लवकरच भाविकांसाठी खुला होणार आहे. येत्या 1 मार्च पासून श्री घृष्णेश्वर मंदिराच्या (Ghrishneshwar Temple ) गाभाऱ्यापर्यंत जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार आहे. 1 मार्च रोजी महाशिवरात्री (Mahashivratri) असून मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोना निर्बंधामुळे यंदा तरी गाभाऱ्यापर्यंत जाऊन दर्शन घेता येईल की नाही, अशी चिंता भाविकांना होती. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर या मंदिरावरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन डोस घेतलेल्यांनाच दर्शन
घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना येत्या 1 मार्चपासून गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन घेता येणार असले तरीही कोरोना प्रतिबंधक लसीच्या नियमांचे पालन भाविकांना करावे लागणार आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जावा, अशा सक्तीच्या सूचना जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिल्या आहेत. 1 मार्च रोजी महाशिवरात्र असून येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यानुसार, योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घालणे बंधनकारक आहे.
23 महिन्यांपासून गाभाऱ्यातून दर्शन बंद होते…
देशात मार्च 2020 पासून कोरोना महामारीला सुरुवात झाली. तेव्हापासून देशभरातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली होती. ही प्रवेश बंदी तब्बल वर्षभर कायम होती. त्यानंतर निर्बंध शिथिल करीत शासनाने धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली केली. परंतु थेट गाभाऱ्यातून दर्शन घेण्यावरील बंदी कायम होती. यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असेलल्या वेरुळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिराचाही समावेश होता. भाविकांना तब्बल 23 महिन्यांपासून गाभाऱ्यातून दर्शनावर बंदी होती. आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले असून जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी मंदिराच्या विश्वस्तांशी संवाद साधून घृष्णेश्वर मंदिराचा गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
इतर बातम्या