Aurangabad Bindass Kavya : ‘असं नाही होऊ शकत, पण आता कुठे शोधायचं?’ औरंगाबादमधील प्रसिद्ध युट्युबर बिदांस काव्या बेपत्ता, आईवडील कासावीस
Bindass Kavya Missing : मुलगी बेपत्ता झाल्याने प्रचंड कासावीस आणि चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी 19.22 मिनिटाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी आपल्या मुलीला शोधण्यासाठी विनंती केली आहे. त्यांनी पोलिसातही तक्रार दाखल केली आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमधील (Aurangabad News) प्रसिद्ध युट्युबर (You Tuber) असलेली बिंदास काव्या (Bindass Kavya) हे चॅनेल चालवणारी मुलगी अचानक बेपत्ता झाली आहे. त्यामुळे तिच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. आपल्या मुलीच्या वेरीफाईड युट्युब अकाऊंटवरच एक व्हिडीओ अपलोड करुन त्यांनी मुलगी बेपत्ता असल्याची माहिती दिलीय. या व्हिडीओच काव्या हीचे आईवडील अत्यंत काळजीत असल्याचं दिसून आलं आहे. काव्याच्या आईला अश्रू अनावर झाले आहेत. तर तिच्या वडिलांनीही मुलगी बेपत्ता असून तिच्याबद्दल कुठे काही माहिती मिळाली, तर तातडीनं आम्हाला कळवा, असं आवाहन केलं आहे. काव्याची आई अनू यादव याच बिंदास काव्या हे युट्युब चॅनेल हॅन्डल करत असल्याचं काव्याच्या प्रोफाईलमध्ये लिहिलंय.
कोण आहे बिंदास काव्या?
बिंदास काव्या ही एक युट्युबर मुलगी आहे. ती ट्रॅव्हल ब्लॉगिंग करत असते. आतापर्यंत 43 लाखापेक्षाही अधिक लोकांनी तिच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब केलंय. तर असंख्य जणांनी तिचे व्हिडीओ पाहिलेत. 2017 सालापासून ती युट्युब चॅनेलवर सक्रिय होती. गेल्या पाच वर्षांत तिने आपली एक वेगळी ओळख युट्युब चॅनेलच्या माध्यमातून तयार केली होती. पालकांच्या मदतीने बिंदास काव्या हे युट्युब चॅनेल काव्या चालवत होती.
सेलिब्रिटी युट्युबर असलेल्या काव्याने कमी वयात यशस्वी भरारी घेतली होती. शुक्रवारपासून काव्या बेपत्ता झाली आहे. रागाच्या भरात ती रात्री घरातून निघून गेल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलंय. दरम्यान, पोलिसही आपल्याला सहकार्य करत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे. शुक्रवार संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या काव्याचा शोध तिचे आईवडील घेत आहेत.
आई-वडिलांकडून शोधाशोध
मुलगी बेपत्ता झाल्याने प्रचंड कासावीस आणि चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी 19.22 मिनिटाचा लाईव्ह व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी आपल्या मुलीला शोधण्यासाठी लोकांना विनंती केली आहे.
आमची कुणीच मदत करत नाही आहे. आम्हाला मदत करा. मुलगी मिळाली नाही, तर आम्ही मरुन जाऊ, असं काव्याची आई ओक्साबोक्शी रडत सांगताना व्हिडीओमध्ये दिसून आलीय. तर तिचे वडील आईची समजून काढत शांत राहण्याचं आवाहन करत आहेत. आता शहरभर फिरून काव्याचे आईवडील तिचा शोध घेत असल्याचं दिसून आलंय.
काव्याने करड्या रंगाचे कपडे घातले असल्याची माहितीही तिच्या आईने दिली आहे. तिने स्कार्फ बांधल्याची कोणतीही शक्यता नाही आहे. तिच्याकडे फारसे पैसेही नाहीत. आपला मोबाईलही ती घरीच सोडून गेल्याचं तिच्या आईने म्हटलंय. सध्या काव्याचे आईवडील गाडीतून आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी वणवण भटकत असल्याचं दिसून येतंय.
काही दिवसांपूर्वीच अमरावतीमधूनही एक तरुणी बेपत्ता झाली होती. चार दिवसांनी ही तरुणी साताऱ्यात आढळून आली होती. रागाच्या भरात ही तरुणी घरातून निघून गेल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं. आता औरंगाबादमधून बेपत्ता झालेली बिंदास काव्या देखील रागाच्या भरात घरातून गेल्याचं तिच्या आईवडिलांनी म्हटलंय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.