Aurangabad | छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’नामकरणास मंजूरी द्या, पालकमंत्री सुभाष देसाई यांची केंद्रीय मंत्री सिंधिया यांच्याकडे मागणी
विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी राज्यशासनाने हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या प्रस्तावास नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मान्यता द्यावी, अशी मागणी देसाई यांनी यावेळी केली.
औरंगाबादः औरंगाबाद विमानतळाचं (Aurangabad Airport) नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करावे, अशी मागणी आज पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी नागरी विमान वाहतूक नंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Sindhiya) यांच्याकडे केली. विमानतळाचे नामकरण, धावपट्टी विस्तारीकरण, तसेच येथील विमानांच्या फेऱ्या वाढवणे, इतर सोयी सुविधा उपलब्ध करणे आदी विषयांसाठी देसाई यांनी सिंधिया यांची भेट घेतली. मंत्री सिंधिया यांच्याकडे देसाई यांनी यासंदर्भातील निवेदनही दिले. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडही उपस्थित होते.
‘विमानतळ धावपट्टीचा विस्तार व्हावा’
मराठवाडयात अजिंठा -वेरुळ लेण्यांसह विविध पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना जपान, कोरिया,अमेरिका आदी देशांतून व वेगवेगळया राज्यांतून तसेच महाराष्ट्रातून मोठया संख्येने पर्यटक भेटी देतात. पर्यटक व प्रवशांचा वाढता ओघ पाहता औरंगाबाद विमानतळाची सध्याची धावपट्टी लहान पडत असून या धावपट्टीच्या विस्ताराची गरज असल्याचे देसाई यांनी यावेळी अधोरेखित केले. या कामी स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक जमीन अधिग्रहण करण्यात येईल तसेच पुढील प्रक्रियेसाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हा विषय गतीने पुढे न्यावा व औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावे, अशी विनंतीही देसाई यांनी केली. राज्यशासनाने जमीन अधिग्रहण करून दिल्यास विमानतळ धावपट्टीचा विषय तत्परतेने पुढे घेवून जावू,असे आश्वासन यावेळी सिंधिया यांनी दिले.
विमान फेऱ्या वाढविण्यात याव्यात
पर्यटक व प्रवाशांची वाढती संख्या पाहता औरंगाबाद विमानतळावर विमानांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणीही देसाई यांनी यावेळी केली. मुख्यत्वे मुंबई-औरंगाबाद शहरांदरम्यान दररोज सकाळी नियमित विमान फेरी सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सध्या उभय शहरांमध्ये सायंकाळी विमान फेरी सुरु आहे.तथापि,पर्यटक, उद्योजक आणि प्रवाशांची वाढती गर्दी व मागणी पाहता तातडीने सकाळच्या विमान फेऱ्या सुरु होण्याची आवश्यकता असल्याचे देसाई यांनी नमूद केले. याबाबत लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन सिंधिया यांनी दिले.
‘नामकरणास केंद्राने मंजुरी द्यावी’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी राज्यशासनाने हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या प्रस्तावास नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मान्यता द्यावी, अशी मागणी देसाई यांनी यावेळी केली. महाराष्ट्रासह देशातील 13 राज्यातून विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव मंत्रालयाकडे आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीने हा विषय मार्गी लावण्याबाबतचे आश्वासन सिंधिया यांनी यावेळी दिले. औरंगाबाद विमानतळावर ‘छत्रपती संभाजी महाराजां’चा पुर्णाकृती पुतळा उाभारण्याची मागणीही देसाई यांनी यावेळी केली यास सिंधिया यांनी सकारात्मकता दर्शविली.