औरंगाबादेत महाविकास आघाडी एकवटली, नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्त वसुली संचलनालय अर्थात ईडीने आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
औरंगाबादः कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी औरंगाबादमधील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकवटली आहे. शहरातील क्रांती चौक परिसरात आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. भाजपने नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात केलेल्या कारवाईचा आंदोलकांनी निषेध केला असून नवाब मलिक यांना महाविकास आघाडीचा पूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. केंद्रातील भाजप (BJP) विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग आंदोलनात आहे.
महाविकास आघाडीचं आंदोलन
केंद्र सरकारमधील भाजप सरकार दडपशाही करत असून याविरोधात राज्यात सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबादेतही राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासह शिवसेनेने क्रांती चौकात आंदोलनाला सुरुवात केली. पुणे, नाशिक, सांगली, आदी ठिकाणीही आज महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. काल मंत्रालयाबाहेर महाविकास आघाडीकडून मंत्रालयाबाहेरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं. नवाब मलिकांनी काही चुकीचं केलेलं नाही. भाजप नेते त्यांना धमकावत आहेत. दाऊदचे संबंध मुद्दाम मलिकांसोबत जोडले जात आहेत, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. काल मंत्रालयातील महाविकास आघाडीच्या आंदोलनात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत कोठडी
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्त वसुली संचलनालय अर्थात ईडीने आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवाब मलिक यांनी भाजपवर अनेक माध्यमांतून टीका केली असून त्यांच्यावर अनेक आरोपही केले आहेत. मलिक यांनी भाजपविरोधात असा पवित्रा घेतल्यामुळेच त्यांच्यावर भाजपने दडपशाही करत ही कारवाई केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला असून याविरोधात तीव्र निषेध नोंदवला आहे.
इतर बातम्या-