Aurangabad MNS | पाणीपट्टी कमी केली, पण पाणी देणार कसे? औरंगाबाद मनसेचा सवाल, संघर्षयात्रेत 3 हजार पत्र जमा झाल्याचा दावा
अनेक महिलांनी पत्र लिहिली. आम्हाला आठ दिवसानंतर पाणी येते,पाणी गढूळ येते, पाण्याला फोर्स येत नाही, पाणी ज्या वेळेस येते त्या वेळेस लाईट गेलेली असते, पाणीपट्टी खूप जास्त आहे ,आम्हाला टॅंकरने पाणी घ्यावे लागते आम्ही मध्यमवर्गी असून आम्हाला हा खर्च परवडत नाही,अशा एक ना एक अनेक समस्या पत्रात मांडल्या.
औरंगाबादः शहरातील पाणी प्रश्न (Water issue) गंभीर होत असून वाढत्या जनक्षोभाला शांत करण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी शहराची पाणीपट्टी निम्म्यावर आणली. मात्र विलंबाने होणारा पाणी प्रश्न यामुळे सुटणार आहे का, असा सवाल मनसेनं (MNS) केला आहे. शहरातील पाणी प्रश्न प्रचंड गंभीर आहे ,शहरात प्रत्येक ठिकाणी आठ ते नऊ दिवसानंतर पाणी येते, गेल्या पंचवीस वर्षापासून फक्त आणि फक्त आश्वासनाशिवाय संभाजीनगर च्या जनतेला काहीच मिळालेले नाही, जायकवाडी ते नक्षत्रवाडी ही मुख्य पाईपलाईन गेल्या पंचवीस वर्षात सत्ताधारी पक्षास पूर्ण करता आली नाही, असा आरोप मनसेनं केला आहे. यासाठीच मनसेनं शनिवारपासून शहरात संघर्षयात्रा सुरु केली आहे. याअंतर्गत वॉर्डा-वॉर्डात फिरून मनसेचे कार्यकर्ते नागरिकांकडून पाणी समस्येवर पत्र लिहून घेत आहेत.
पहिल्या दिवशी 3 हजार पत्र जमा
मनसेच्या पाणी संघर्षयात्रेची सुरुवात शनिवारी टीव्ही सेंटर परिसरातून करण्यात आली. मनसेचे शेकडो कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते. नागरिकांकडून त्यांनी पाणी समस्येविषयीचे पत्र लिहून घेतले. ही पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवली जाणार आहेत. शनिवारी एका दिवसात दुपारपर्यंत जवळपास दोन हजार तीनशे पत्र जमा झाली. संध्याकाळी आणखी एक हजार पत्र जमा होतील, असा दावा मनसेतर्फे करण्यात आला आहे.
महिलांचा प्रतिसाद
शनिवारी सकाळीच मनसेचे कार्यकर्ते टीव्ही सेंटर परिसरात दाखल झाले, तिथून पवन नगर रायगड नगर,श्रीकृष्ण नगर आयोध्यानगर, बळीराम पाटील शाळा, आदि परिसरामध्ये घरोघरी जाऊन पोस्ट कार्डचे वाटप करण्यात आले,येथील महिलांनी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहीत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या असून महिलांचा प्रचंड प्रतिसाद या पाणी संघर्ष यात्रेला मिळाला आहे.
रिकाम्या भांड्यात महिलांची पत्रे
अनेक महिलांनी पत्र लिहिली. आम्हाला आठ दिवसानंतर पाणी येते,पाणी गढूळ येते, पाण्याला फोर्स येत नाही, पाणी ज्या वेळेस येते त्या वेळेस लाईट गेलेली असते, पाणीपट्टी खूप जास्त आहे ,आम्हाला टॅंकरने पाणी घ्यावे लागते आम्ही मध्यमवर्गी असून आम्हाला हा खर्च परवडत नाही,अशा एक ना एक अनेक समस्या पत्रात मांडल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे सर्व पत्र रिकाम्या हांड्यामध्ये जमा केले आहेत, यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हातातील भोंगा घेऊन नागरिकांना पत्र लिहिण्यासाठी आव्हान करण्यात येत होते. ही संघर्ष यात्रा जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली निघाली असून यामध्ये राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, वैभव मिटकर,बीपीन नाईक,शहर अध्यक्ष गजानन गौडा पाटील,आशिष सुरडकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.