Aurangabad | पाणी प्रश्नावर भाजपनंतर मनसेही मैदानात, औरंगाबादेत संघर्ष यात्रा काढणार, 25 वर्षांच्या समस्येसाठी 25 हजार पत्र लिहून घेणार!
उद्यापासून म्हणजेच 14 मे पासून औरंगाबादेत मनसेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पाणी संघर्ष यात्रा काढणार आहेत. तसेच 25 हजार लोकांकडून पत्रं लिहून घेणार आहेत. नंतर ही पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
औरंगाबादः शहरातील पाण्याचा ज्वलंत प्रश्न (Water issue) घेऊन भाजपातर्फे येत्या 23 मे रोजी औरंगाबादेत मोठं आंदोलन केलं जाणार आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे (Shiv Sena) धाबे दणाणले असतानाच आता मनसेनंही या प्रश्नावर रणांगणात उतरायचं ठरवलं आहे. हर्सूल तलाव ते जटवाडा नवीन पाइपलाइन दहा दिवसात पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करता, मग जायकवाडी (Jaikwadi) ते नक्षत्रवाडी पाइपलाइन टाकण्यासाठी 25 वर्षे का लागली, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. गेल्या 25 वर्षांपासून औरंगाबाद शहरातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. आधी समांतर जलवाहिनीचे गाजर आणि त्यानंतर सुरु असलेल्या 1680 कोटी रुपयांच्या योजनेचे का, यात शहरातील नागरिक पुरते भाजून निघाले आहेत, असा आरोप मनसेने केला आहे. टक्केवारी, कंत्राट आणि टँकर लॉबीपायी 17 लाख लोकांच्या भावना तुडवल्या गेल्या आहेत. आता कितीही दाखवण्याचा प्रयत्न केलात तरी किमान दोन वर्ष ही योजना पूर्णत्वास जाणार नाही, यासाठीच मनसेतर्फे पाणी संघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे.
मनसेची संघर्ष यात्रा कशी?
उद्यापासून म्हणजेच 14 मे पासून औरंगाबादेत मनसेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पाणी संघर्ष यात्रा काढणार आहेत. तसेच 25 हजार लोकांकडून पत्रं लिहून घेणार आहेत. नंतर ही पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनेक भागात नऊ ते दहा दिवसांनी पाणी येते. काही ठिकाणी रात्री 3 वाजता पाणी सोडले जाते. काही लाइनमनला कोणत्या भागात पाणी सोडायचे यावर दबाव टाकला जातो. या समस्यांनी विविध भागातील नागरिक त्रस्त आहेत. या भावना पत्रांतून लिहून घेतल्या जातील.
औरंगाबादेतून पाच हजार अयोध्येला जाणार
औरंगाबाद मनसेने घेतेल्या पत्रकार परिषदेत सतनामसिंग गुलाटी, आशिष सुरडकर, संकेत कुलकर्णी, बिपीन नाईक उपस्थित होते. यावेळी औरंगाबादच्या आंदोलनाची माहिती देतानाच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासोबत येथील कार्यकर्तेही जाणार असल्याची माहिती प्रकाश महाजन यांनी दिली. शहरातून पाच ते सहा हजार कार्यकर्ते अयोध्येला आपापल्या सोयीनुनसार जातील, असं त्यांनी सांगितलतं. आम्ही रस्त्याने जाणार. आंध्र प्रदेश, कर्नाटकातील लोक शिर्डीत पूजा करण्यासाठी येतात. त्यांना कुठेही अडवण्यात येत नाही, मग अयोध्येला जाण्याचा आमचा हक्क आहे, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.