Aurangabad | नाथषष्ठीच्या उत्सवात खिसेकापू आणि मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट, 25 भामट्यांना पोलिसांच्या बेड्या!
पैठण येथील तीन दिवसाच्या सोहळ्याची आज सांगता होणार आहे. काल्याची दहीहंडी फोडून शुक्रवारी महोत्सवाची समाप्ती होईल. पारंपरिक धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी नाथषष्ठी सोहळ्याची काला दहीहंडी फोडून सांगता होणार आहे.
औरंगाबादः नाथषष्ठीनिमित्त पैठणमध्ये (Paithan Nathshasthi) जमलेल्या भाविकांमध्ये खिसेकापू आणि मंगळसूत्र चोरांचाही सुळसुळाट असल्याचे दिसून आले. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून जवळपास 25 चोरांना ताब्यात घेतले आहे. भाविकांचे खिसे कापणे, महिलांचे मंगळसूत्र पर्स चोरणे अशा प्रकारांसाठी हे चोरटे महाराष्ट्राच्या (Maharashtra) विविध जिल्ह्यांतून पैठणमध्ये दाखल झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र कोणताही मोठा गैरप्रकार घडण्याआधी पोलिसांनी साध्या वेशात गस्त घालून, अतिशय शिताफीने सापळा रचून चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. यापैकी 19 पुरुष तर सहा महिला चोर आहेत, अशी माहिती पोलिसांनी (Aurangabad police) दिली. या सर्वांना सध्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, नाथषष्ठी महोत्सवाचा आजचा तिसरा दिवस असून संध्याकाळी काल्याची दहीहंडी फोडण्यात येणार आहे. लाखो भाविक हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी उत्सुक आहेत.
महाराष्ट्रातून भाविक आणि चोरही दाखल
कोरोना संकटामुळे दोन वर्ष पैठण येथील नाथषष्ठीच्या उत्सावात खंड पडला होता. मात्र यंदा रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे उत्सव भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी देण्यात आली. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून शेकडो दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्या असून हे भाविक जवळपास 300 राहुट्यांमध्ये राहत आहेत. याच भाविकांमध्ये चोरीच्या उद्देशानेही काही लोक दाखल झालेले असून याची कल्पना पोलिसांना होती. त्यामुळेच पोलिसांनी काही गैरप्रकार होऊ नये, यासाठी सापळा रचून अशा लोकांना ताब्यात घेतले आहे. हैदराबाद, सोलापूर, नगर, बीड आदी ठिकाणाहून हे भामटे आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पैठणमध्ये आज दहीहंडी महोत्सव
पैठण येथील तीन दिवसाच्या सोहळ्याची आज सांगता होणार आहे. काल्याची दहीहंडी फोडून शुक्रवारी महोत्सवाची समाप्ती होईल. पारंपरिक धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी नाथषष्ठी सोहळ्याची काला दहीहंडी फोडून सांगता होणार आहे. परंपरेनुसार, नाथ वंशज यांच्या हस्ते समाधी मंदिरात व मंदिराबाहेर विश्वस्त मंडळाच्या वतीने हभप केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन झाल्यावर काला दहीहंडी फोडून महोत्सवाची सांगता होईल.
इतर बातम्या-