Aurangabad | वायफाय, केबलवाला असल्याचं सांगत सोसायटीत एंट्री, पुण्यात घरफोड्या करणारा औरंगाबादचा भामटा अटकेत!
पोलिसांनी संशयिताची कसून चौकशी केली असता बरीच माहिती समोर आली. प्रज्वल हा अविवाहित असून औरंगाबादमधील टोलनाक्यावर मॅनेजर म्हणून पूर्वी काम करत होता. नोकरी गेल्यानंतर त्याने घरफोडी सुरु केली.
औरंगाबादः सोशल मीडियावर चोरी (Theft) आणि घरफोड्या कशा करायच्या हे शिकून घेतल्यावर औरंगाबादचा भामटा पुण्यात गेला. तेथील सोसायट्यांमध्ये वायफायवाला, केबलवाला असल्याचं सुरक्षारक्षकांना (Security guard) सांगून सोसायटीत प्रवेश करायचा. ज्या ठिकाणी कुलूप दिसेल, तिथे घरफोडी करायचा. पुणे अखेपोलिसांनी र या आरोपीला (Accused) अटक केली असून त्याच्या ताब्यातून 9 neK 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस चौकशीनंतर हा भामटा औरंगाबादचा असून त्याचं नाव प्रज्वल गणेश वानखेडे ऊर्फ रेवणनाथ असल्याचं उघड झालं आहे. औरंगाबादमध्ये टोलनाक्यावरील मॅनेजरची नोकरी गेल्यानंतर सोशल मीडियावर घरफोडीचे व्हिडिओ पाहून त्याने चोऱ्या करणे सुरु केले होते, असे पोलिसांनी सांगितले.
कशी पकडली चोरी?
पुण्यातील कसबा पेठेतील सागर भोसले हे घरात झोपले होते. त्यांची पत्नी पूजा या घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावून रास्ता पेठ येथे कामासाठी गेल्या होत्या. यावेळी एकाने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून मौल्यवान वस्तू चोरल्या. त्यानंतर भोसले यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यावेळी एक संशयित फिरताना दिसला. त्याचा माग काढला असता एका हॉटेलच्या लॉजमध्ये जाताना दिसला. संबंधित पोलिसांनी त्याला लॉजमघ्ये जाऊन अटक केली.
औरंगाबादची नोकरी गेली, पुण्यात चोऱ्या
पोलिसांनी संशयिताची कसून चौकशी केली असता बरीच माहिती समोर आली. प्रज्वल हा अविवाहित असून औरंगाबादमधील टोलनाक्यावर मॅनेजर म्हणून पूर्वी काम करत होता. नोकरी गेल्यानंतर त्याने घरफोडी सुरु केली. औरंगाबाद येथून पुण्यात येऊन तो लॉजवर रहात होता. पुण्यातील वेगवेगळ्या भागात फिरून तो बंद असलेली घरं फोडायचा. कुणाला संशय येऊ नये म्हणून वॉचमनला वायफायवाला, केबलवाला असल्याचे सांगून सोसायटीतील फ्लॅट्सचे कुलूप कटरच्या सहाय्याने फोडत असे. नोकरी सुटल्यानंतर पैसे कमावण्यासाठी काय पर्याय आहे, याचा विचार करतानाच तो गैरमार्गाला लागल्याचे समोर आले. सोशल मीडियावर घरफोडीचे व्हिडिओ पाहून त्याचे तंत्र शिकल्याचे प्रज्वलने सांगितले. दरम्यान पुणे पोलिसांनी प्रज्वलकडील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. आता चोरीच्या तक्रारीनुसार, मूळ मालकांशी संपर्क साधून सदर वस्तू परत केल्या जातील. काल पुणे पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.