औरंगाबादेत राडा! माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि पत्नी संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की!
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्टीकरण दिले असून सभेत मी कुणाचेही नाव घेतले नाही. त्यांनी उगाच सर्व प्रकार अंगावर ओढून घेतला तर मी तरी काय करणार, असा सवाल माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
औरंगाबादः कन्नड तालुक्यातील औराळा इथं काल माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संजना जाधव (Sanjana Jadhav) यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते काल गुरुवारी आमने सामने आले. त्यानंतर काही वेळासाठी औराळ्यातील (Kannad) वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले होते. येथील आठवडी बाजारात देखील या धक्काबुक्कीचे पडसाद दिसून आले. औराळा इथं हर्षवर्धन जाधव यांची सभा सुरु होती. सभा संपताच हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. नंतर या वादाला धक्काबुक्कीचे स्वरुप आले. गावातील काही तरुणांच्या मध्यस्थीने अखेर काही काळाने हे वातावरण शांत झाले.
काय आहे नेमकं कारण?
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावासाहेब दानवे यांच्या त्या कन्या आहेत. मागील वर्षीच हर्षवर्धन जाधव यांनी संजना जाधव यांना आता माझे नाव लावू नका, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर संजना जाधव यादेखील राजकारणात सक्रीय झाल्या असून कन्नड-सोयगाव मतदारसंघात त्या अॅक्टिव्ह आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कन्नड तालुक्यातील विविध गावांमध्ये फिरत आहेत. सभा घेत आहेत. यासाठीच गुरुवारी औराळा इथं हर्षवर्धन जाधव यांची दुपारी बारा वाजेच्या सुमारास सभा सुरु होती. या सभेत हर्षवर्धन जाधव यांनी कुणाचेही नाव न घेता सर्व पक्षीय नेत्यांसह संजना समर्थकांवर टीका केली. दरम्यान, संजना जाधव यांचे समर्थक तथा शेरोडीचे सरपंच जयेश बोरसे, आडगावचे सरपंच ज्ञानेश्वर बोरसे, आडगावचे सरपंच ज्ञानेश्वर निकम हे सभेदरम्यान स्टेजवर जाऊन बसले. सभा संपताच त्यांनी हर्षवर्धन जाधव यांना जाब विचारला. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. नंतर या वादाला धक्काबुक्कीचे स्वरुप आले. गावातील काही तरुणांच्या मध्यस्थीने अखेर काही काळाने हे वातावरण शांत झाले.
हर्षवर्धन जाधव काय म्हणाले?
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्टीकरण दिले असून सभेत मी कुणाचेही नाव घेतले नाही. त्यांनी उगाच सर्व प्रकार अंगावर ओढून घेतला तर मी तरी काय करणार, असा सवाल माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
संजना जाधव काय म्हणाल्या?
सदर राड्यावर संजना जाधव यांची प्रतिक्रिया विचारली असता, या कार्यक्रम आणि औराळ्यात झालेल्या बाचाबाचीविषयी मला काहीही माहिती नव्हते. हा सगळा प्रकार घडल्यानंतर माझ्या कानावर आला, त्यामुळे याविषयी काहीही प्रतिक्रिया देऊ शकणार नाही, असे वक्तव्य संजना जाधव यांनी केले.
इतर बातम्या-