Raj Thackeray | राज्याचं लक्ष औरंगाबादच्या सभेकडे, कार्यकर्त्यांची जय्यत तयारी, पोलिसांची परवानगी मिळणार का?
राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांनी परवानगी दिली नाही तरीही राज ठाकरे यांची जंगी सभा होणारच, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान कार्यकर्त्यांनी खचाखच भरणार, असा विश्वास मनसेने व्यक्त केला आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच 01 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होईल, अशी घोषणा केल्यानंतर अवघ्या राज्याचं लक्ष या सभेकडे लागलं आहे. त्यातच 03 मेपर्यंत राज्यातील सर्व मशीदींवरचे भोंगे (Loud Speakers) काढले पाहिजेत, असा इशाराही राज ठाकरेंनी दिलाय. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादसारख्या (Aurangabad MNS) संवेदनशील शहरातील ही सभा अधिक महत्त्वाची ठरणार आहे. या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, अशी भीतीदेखील आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांकडून तशी उपाययोजनादेखील केली जात आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये सभा होणार म्हटल्यावर जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राज ठाकरेंनी घोषणा केल्यापासूनच मनसे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आज औरंगाबादमधील पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मनसेने सदर सभेबाबत रितसर परवानगी मागितली. तसेच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाचीही पाहणी आज करण्यात आली.
कुठे होणार सभा ?
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची औरंगाबादमधील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभा चांगलीच गाजली होती. आता राज ठाकरे यांनीदेखील औरंगाबादमधील आगामी सभा त्याच ठिकाणी होईल, अशी घोषणा केली आहे. या मैदानावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार असल्याने मनसैनिकांची जोरदार तयारी सुरु आहे.
औरंगाबाद मनसे तयारीला
महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादेत राज ठाकरेंची सभा होणार असल्याने औरंगाबाद मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. मनसे पदाधिकारी वॉर्डा-वॉर्डांमध्ये फिरणार असून सभेसाठी निमंत्रण देणार आहेत. काही हिंदु संघटनाही सभेला येण्याच्या तयारी असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांना निवेदन, परवानगी मिळणार का?
01 मे रोजी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी याकरिता आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मनसेच्या एका शिष्टमंडळाने सभेसाठी परवानगी मागणारे एक निवेदन सादर केले आहे. पोलीस आयुक्तांनी मात्र अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही.
परवानगी मिळाली नाही तरी सभा होणारच- मनसे
दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांनी परवानगी दिली नाही तरीही राज ठाकरे यांची जंगी सभा होणारच, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान कार्यकर्त्यांनी खचाखच भरणार, असा विश्वास मनसेने व्यक्त केला आहे.
इतर बातम्या-