‘बिर्याणी आंदोलन मागे’, मनसेकडून MIM ची खिल्ली, संभाजीनगराच्या वादात नवा ट्विस्ट, पुढे काय होणार?
Aurangabad Vs Sambhajinagar | औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगरचा वाद नामांतरानंतरही सुरुच आहे. एमआयएम आणि मनसे यावरून आमने-सामने आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर| औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) करण्याच्या वादात आता नवा ट्विस्ट आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं साखळी उपोषण एमआयएमने अचानक मागे घेतलंय. गुरुवारी मनसेच्या वतीने संभाजीनगर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. मनसेच्या रॅलीचं नाव स्वप्नपूर्ती असं ठेवण्यात आलं होतं. शहरवासियांचं अनेक दिवसांचं स्वप्न साकार झाल्याची भावना त्यामागे होती. मात्र या रॅलीतून उघड उघड खा. जलील यांच्या भूमिकेचा विरोध करण्यात आला. त्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे संभाजीनगरच्या नामांतरावरून शहरात वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा वेळी खा. जलील यांनी आपण आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. यावरून मनसेने एमआयएमची खिल्ली उडवली आहे. मनसे आक्रमक झाल्यामुळे बिर्याणी आंदोलन मागे घेण्यात आलं, असं वक्तव्य मनसे जिल्हा प्रमुख सुमित खांबेकर यांनी केलंय.
खा. जलील यांचं उपोषण मागे
औरंगाबाद नामांतरविरोधी संघर्ष समितीतर्फे खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात ४ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु होतं. मात्र १७ मार्च रोजी खा. इम्तियाज जलील यांनी पोलीस आयु्क्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेतली. तसेच हे आंदोलन थांबवत असल्याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी शहरातील उद्योगपतींनीही ही आंदोलनं थांबवण्याची विनंती केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर एमआयएम तसेच नामांतरविरोधी संघटनांनी आम्हाला शहरात शांतता हवी आहे. येत्या काही दिवसात पवित्र रमजान सुरु होत असल्याने आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.
बिर्याणी उपोषणावरून खिल्ली
खा. जलील यांच्या नेतृत्वात संभाजीनगरात नामांतरविरोधी उपोषण सुरु करण्यात आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी खासदार जलील तेथे बिर्याणी खाताना दिसले. त्यांचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. बिर्याणी उपोषण अशी खिल्लीही उडवण्यात आली. हाच धाडा पकडत मनसेने नवं ट्विट केलंय.
मनसेचं ट्विट चर्चेत
काल खा. जलील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी ट्विट केलं. तसेच एमआयएमला इशारा दिलाय.
#१०_दिवसापूर्वी_कोण_मनसे_म्हणणाऱ्या_Mim_खासदार_जलील_यांना_मनसेची_ताकद_कळाली#मनसेच्या_आक्रमक_आंदोलना_मुळे_बिर्याणी_आंदोलन_मागे
आता ते न्यायालयीन लढाई लढणार असे त्याने आत्ताच सांगितले,तुम्ही जसे लढाल तसे आम्ही लढू आम्हीही आमची वकिलांची फोज्ज तय्यार ठेवून न्यायालयीन लढाई लढणार pic.twitter.com/3m3oHtiLtD
— Sumit Khambekar (@KhambekarSumit) March 17, 2023
वकिलांची फौज तयार…
नामांतर विरोधातील साखळी उपोषण स्थगित करणार असल्याची घोषणा एमआयएमने केली आहे. मात्र आमची कायदेशीर लढाई सुरुच राहील, असेही खा. जलील यांनी स्पष्ट केले. यावरून मनसेनेही इशारा दिलाय. आमचीदेखील वकिलांची फौज तयार आहे. नामांतरासाठीचा लढा आम्हीदेखील तितक्याच क्षमतेनं लढू, असं खांबेकर म्हणालेत.