म्हणाला मी ‘कोकाकोला’चा सीईओ, टिंडर डेटिंग अॅपवर ओळख, औरंगाबादेत उच्चशिक्षित महिलेला 97 हजारांचा गंडा
सदर तरुणाने आपण भारतात आलो असल्याचे भासवले. दिल्ली विमानतळावर सोबत आणलेले ब्रिटिश चलनातील दीड लाख पौंड पकडले असून ते सोडवण्यासाठी कर भरावा लागणार असल्याची थाप मारली.
औरंगाबाद : टिंडर डेटिंग अॅपवरून (Tinder dating app) ओळख करून घेत आपली वेगळीच ओळख सागून महिलेला फसवल्याचा प्रकार घडल्याचं औरंगाबादेत (Aurangabad Crime) उघड झालं आहे. महिलेला आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या या भामट्याने आपली ओळख तर लपवलीच, शिवाय आपण थेट कोकाकोला कंपनीचे सीईओ (CEO) असल्याचं सांगितलं. आधी फ्रेंड रिक्वेस्ट, मग गप्पांना सुरुवात झाली. मैत्री वाढत गेली आणि महिलेला फसवण्यासाठी त्यानं भेटवस्तू पाठवण्याचा बहाणा केला. या प्रकारातून तिची मोठी आर्थिक फसवणूक केली. एवढंच नाही तर मनी लाँड्रिंग प्रकरणात तुम्हाला गोवलं जाईल, अशी धमकीही दिली. अखेर महिलेने पोलिसांकडे सदर प्रकाराची तक्रार केल्यानंतर अगदी थंड डोक्याने आपली फसवणूक करण्यात आल्याचं महिलेच्या लक्षात आलं.
कशी झाली फसवणूक?
या घटनेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्सूल परिसरात राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेने नोव्हेंबरमध्ये टिंडर या अॅपवर अकाउंट तयार केले होते. काही दिवसांनी त्यांना केल्विन विल्यम्स नावाच्या प्रोफाइलवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. महिलेने काहीच पडताळणी न कराता रिक्वेस्ट मान्य केली. सुरुवातीला काही दिवस सामान्य संवाद झाल्यानंतर सदर तरुणाने आपण कोका कोला कंपनीचे सीईओ असल्याचे सांगितले. तसेच लंडनच्या लायसेस्टर शहरात राहत असल्याचे सांगितले. दोघांचे रोजच बोलणे होऊ लगाले. त्यानंतर मैत्री वाढत गेली. 29 नोव्हेंबर रोजी त्याने महिलेला आपण भारतात येत असल्याचे सांगितले. तसेच मोबाइलवर विमानाच्या तिकिटाचा फोटो पाठवला. व्हॉट्सअप क्रमांकाची देव-घेव झाली.
कशासाठी पैसे मागितले?
सदर तरुणाने आपण भारतात आलो असल्याचे भासवले. दिल्ली विमानतळावर सोबत आणलेले ब्रिटिश चलनातील दीड लाख पौंड पकडले असून ते सोडवण्यासाठी कर भरावा लागणार असल्याची थाप मारली. त्यासाठी मदत म्हणून नीता दास नामक महिलेल्या खात्यावर 55 हजार रुपये तत्काळ भरण्यास सांगितले. इथे महिलेने RTGS द्वारे हे पैसे भरले. 1 डिसेंबर 2021 रोजी नीता दास यांनीच महिलेला संपर्क केला. कर चुकवण्यासाठी तुम्ही केल्विनला मदत केल्याचे सिद्ध झाले असून मनी लाँड्रिंग प्रकरणात तुम्हाला आरोपी करण्यात येईल, अशी धमकी दिली. त्यामुळे ती घाबरली आणि सर्वांनाच हा प्रकार कळेल, या भीतीने पुन्हा 42,800 रुपये पाठवले. त्यानंतर दोन्ही क्रमांक बंद झाले. वारंवार संपर्क साधूनही फोन लागत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने कुटुंबाला विश्वासात घेत हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर सदर घटनेची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. तपास निरीक्षक अमोल देवकर हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. या प्रकरणी केल्विन विल्यम्स (रा. लंडन) आणि नीता दास (रा. दिल्ली) या प्रोफालइधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या-