Aurangabad | औरंगाबाद ते पैठण रस्ता रुंदीकरणाच्या भूमीपूजनाचा मुहूर्त ठरला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार!
औरंगाबाद ते पैठण हा रस्ता अत्यंत अरुंद आणि नादुरुस्त असल्याने येथे प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात अचानक कमी झाली. पैठण रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण व्हावे, अशी मागणी कित्येक वर्षांपासून सुरु आहे. आता या रस्ते कामाचे भूमीपूजन होणार असल्याने नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.
औरंगाबाद | 12 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या औरंगाबाद ते पैठण (Aurangabad To Paithan) रस्त्याच्या भूमीपूजनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या 24 एप्रिल रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते या रस्त्याच्या रुंदीकरण कामाचे भूमीपूजन आयोजित करण्यात आले आहे. औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक 752 ई चे रुंदीकरण कामासाठी 950 कोटींचा निधी खर्च केला जाणार असून यात भूसंपादनासह चौपदरी डांबरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पैठणकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भूमीपूजनासह सोलापूर-धुळे (Solapur- Dhule) एन एच 211 अंतर्गत झाल्टा ते करोडी ते तेलवाडी या महामार्ग टप्प्याचे लोकार्पणही केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
१२ वर्षांच्या तपानंतर मुहूर्त सापडला
औरंगाबाद ते पैठण या 60 किमी अंतराच्या रस्ता रुंदीकरण आणि चौपदरीकरणाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून रेंगाळला आहे. हा काही वर्षांपूर्वी एनएचएआयने हा रस्ता चौपदरी करावा, असा प्रस्ताव ठेवला. भारतमाला प्रकल्पाचा भाग असलेल्या या महामार्गासाठी अंदाजे ९५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या महामार्गासाठी भूसंपादनाची अधीसूचना जाहीर झाली आहे. काही ग्रीन फील्ड तर काही प्रमाणात ब्राऊन फिल्डमध्ये हा महामार्ग करण्यात येणार आहे. औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ऑरिक सिटीच्या शेंद्रा टप्प्याची विकासकामे सुरु झाली तेव्हा शेंद्रा बिडकीन टप्पे जोडतानाच औरंगाबाद-पैठण मार्गाचाही विकास व्हावा, अशी आग्रही मागणी केली गेली. राजकीय मंडळींनी वारंवार यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे आग्रह धरला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी एनएचएआयने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. या रस्त्यासंबंधीचा डीपीआर मंजुरीच्या प्रक्रियेत आहे.
औरंगाबाद ते पैठण रस्त्याची वैशिष्ट्ये काय?
दक्षिण काशी म्हणून पैठणची ओळख आहे. मात्र औरंगाबादहून पैठणकडे जाणाऱ्या रस्ता अनेक वर्षांपासून जीर्णावस्थेत आहे. त्यामुळे पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान, संत एकनाथ महाराज मंदिर, गोदाकाठ आदी सर्वच स्थळांकडे येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांचा ओढा मागील काही वर्षात कमी झाला होता. हा रस्ता अत्यंत अरुंद आणि नादुरुस्त असल्याने येथे प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात अचानक कमी झाली. पैठण रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण व्हावे, अशी मागणी कित्येक वर्षांपासून सुरु आहे. आता या रस्ते कामाचे भूमीपूजन होणार असल्याने नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. रस्त्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-
– महानुभाव आश्रम चौक ते पैठण असा चौपदरी रस्ता असेल. – औरंगाबाद ते पैठण रस्त्यावर चितेगाव, बिडकीन आणि ढोरकीन ही तीन मोठी गावे आहेत. या तिन्ही गावांना बायपास केला जाणार आहे. त्यामुळे या गावांच्या बाहेरून पूर्ण वाहतूक वळेल. – नक्षत्रवाडी आणि गेवराई तांडा या गावांमध्ये उड्डाणपूल असतील. – महामार्गालगतच्या गावांसाठी सर्व्हिस रस्ता तयार करण्यात येणार आहे.
इतर बातम्या-