रस्त्यावर लटकलेल्या तारा बैलांच्या शिंगात अडकल्या! बैलजोडीसह सख्खे भाऊ शॉक लागून जागीच ठार
Aurangabad News : ते संध्याकाळी पाऊस पडून गेल्यानंतर शेतातून घराकडे निघाले होते.
औरंगाबाद : दोघा भावांचा विजेचा शॉक (Electric Shock) लागून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर (Aurangabad Vaijapur) तालुक्यामध्ये घडली. वैजापूर तालुक्यातील मौजे बायगाव येथे चेळेकर वस्तीत शॉकमुळे दोघा भावांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. रस्त्यात लटकलेल्या तारा बैलांच्या शिंगात अडकल्या होत्या. त्यामुळे आधी बैलांना शॉक लागला. बैलजोडी जागीच कोसळली. तर बैलगाडीत असलेल्या शेतकऱ्यालाही विजेचा जबर शॉक बसला आणि त्यांचाही मृत्यू झाला. ही घटना पाहत असताना सख्खा भाऊ आपल्या भावाला वाचवण्यासाठी धावला. पण त्यांनाही मृत्यूने कवटाळलं आणि दोघा सख्ख्या भावांचा शॉक लागून जीव गेला. बुधवारी ही हृदयद्रावक घटना घडली. काही दिवसांपूर्वीच कन्नड तालुक्यात नावाडीत चौघांचा शॉक लागून मृत्यू झाला होता. रस्त्यावर पडलेल्या वीजवाहक तारांमुळे शॉक लागून चार जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा तशीच घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण औरंगाबाद (Aurangabad News) जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातो आहे.
दुर्दैवी घटना
70 वर्षांचे साहेबराव गणपत चेळेकर हे एकत्र कुटुंबात राहत होते. ते संध्याकाळी पाऊस पडून गेल्यानंतर शेतातून घराकडे निघाले होते. बैलागाडून येत असताना त्यांच्या बैलगाडीच्या बैलाची शिंगं वीज वाहणाऱ्या तारांमध्ये अडकली. दुर्दैवानं या तारा रस्त्यावर लटकलेल्या होत्या. विजेचा शॉक लागून बैल जागेवरच कोसळले. बैलांना विजेच्या धक्क्याने मृत्यूचे दाढेत ओढलं. त्यानंतर वीजप्रवाह बैलगाडीत शिरला आणि त्याचा फटका बैलगाडी हाकत असणाऱ्या साहेबराव चेळेकर यांनाही बसला. विजेच्या धक्क्याने ते तडफडले.
काळीज सुन्न
बैलगाडी लोखंडी असल्यामुळे विजेचा प्रवाह वेगानं पसरला. सख्खा भाऊ शॉक लागून तडफडतोय हे पाऊन त्यांचा सख्खा भाऊ बाबुराव चेळेकरही मदतीसाठी धावला. इतर गावकऱ्यांनीही आरडाओरडा गेला. पण काही कळायच्या आत बाबुराव यांनाही शॉक बसला आणि ते देखील जागीच कोसळले. अवघ्या काही क्षणात दोघा सख्ख्या भावांचा विजेच्या शॉकने जीव घेतला. ही घटना गावातील लोकांनी पाहिल्यानंतर त्यांचंही काळीज सुन्न झालं होतं.
चेळेकर कुटुंब पोरकं
एका शेतकऱ्यांने विनापोल बोअरसाठी गेलेले आणि रस्त्यावरच लटकलेल्या अवस्थेत असलेले वीजवाहक बेल आणि सर्व्हिस वायर टाकून ठेवलेले होते. या वायरमधून सुरु असलेल्या वीज प्रवाहानं चेळेकर बंधूंची जीव घेतला. या घटनेनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जातेय. या घटनेनं दोन्ही भावांना तातडीनं रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे चेळेकर कुटुंब पोरकं झालंय.