Beed | घाटनांदूर रेल्वे स्टेशन मास्तरचा हृदय विकाराने मृत्यू, दोन रेल्वे खोळंबल्याने घटना उघडकीस
दरम्यान, रेल्वेची लाइन मिळत नसल्याने पनवेल ते परळी ही रेल्वे पानगाव रेल्वे स्थानकात तर काकीनाडा शिर्डी एक्पसप्रेस परळी रेल्वे स्थानकात दीड तास थांबवण्यात आली होती.
बीडः बीड जिल्ह्यातील घाटनांदूर (Ghatnandur) रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तरचा (Station Master) हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. सोमवारी पहाटे ड्युटीवर असताना स्टेशन मास्तर मुसाफिर सिंह (वय 44 ) यांना हार्ट अटॅक आल्याचे समोर आले आहे. या स्टेशनकडे पहाटेच्या वेळी येणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना सिग्नल मिळत नव्हते. त्यामुळे त्यांचा खोळंबा झाला. यासाठी स्टेशन मास्तरांना वारंवार फोन लावण्यात आले. मात्र काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान रेल्वे गेटमन (Railway Gateman) यांच्याशी संपर्क साधून स्टेशन मास्तर फोन का उचलत नाहीत, पाहून या, असे सांगण्यात आले. रेल्वे गेटमन स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांना मुसाफिर सिंह हे खुर्चीवर मृत अवस्थेत असल्याचे आढळले. त्यांन तत्काळ पानगावच्या स्टेशन मास्तरांना याविषयीचीची माहिती दिली. मुसाफिर सिंह यांनी दिवसभराची ड्युटी केल्यानंतर पुन्हा रात्रपाळीतील कर्मचारी नसल्याने ते नाइटशिफ्ट देखील करू लागले. याच दरम्यान रात्री तीन वाजेच्या सुमारास त्यांना हार्ट अटॅक आल्याचा अंदाज प्राथमिक माहितीतून वर्तवला जात आहे.
दोन एक्सप्रेस खोळंबल्याने घटना उघडकीस
पनवेल ते परळी रेल्वेला लाइन मिळण्यासाठी पानगाव येथे कार्यरत असलेले रेल्वे स्टेशन मास्तर नितीन संभारे यांनी मुसाफिर सिंह यांना पहाटे पावणे चारच्या सुमारास फोनद्वारे संपर्क केला. मात्र मुसाफिर यांनी फोन उचलले नाही. रेल्वे गेटमन विजय मीना यांना तेथे जाऊन पाहण्यास सांगितले असता घाटनांदूर स्टेशन मास्तर त्यांच्या खुर्चीवर मृत अवस्थेत पडलेले दिसले. मीना यांनी तत्काळ पानगावच्या स्टेशन मास्तर सांबरे यांना ही माहिती दिली. सांबरे यांनी वरिष्ठांना सांगितले.
दीड तासानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत
दरम्यान, रेल्वेची लाइन मिळत नसल्याने पनवेल ते परळी ही रेल्वे पानगाव रेल्वे स्थानकात तर काकीनाडा शिर्डी एक्पसप्रेस परळी रेल्वे स्थानकात दीड तास थांबवण्यात आली होती. पानगाव रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर नितीन सांबरे यांनी घाटनांदूर पहाटे साडे पाचला येऊन रेल्वेला लाइन दिली. त्यानंतर रेल्वेची वाहतूक सुरु झाली.
इतर बातम्या-