Aurangabad bus accident : औरंगाबादेत 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस पलटली, किन्हळ फाट्याजवळ अपघात, आठवड्यातील दुसरी घटना
शिरुरवरून औरंगाबादला परिवहन मंडळाची बस प्रवासी घेऊन दुपारी दोन वाजता जात होती. रस्त्यावरील चिखलामुळं एसटी वाहकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
औरंगाबाद : औरंगाबादच्या किन्हळ फाट्याजवळ ( Kinhal Phata) थोड्या वेळापूर्वी अपघात झाला. कसाबखेड्याला (Kasabkheda) जाणारी बस पलटली. यात सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी सुखरूप (passengers safe) असल्याची माहिती आहे. पावसामुळं ग्रामी भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. सतत छोटे-मोठे अपघात होत असतात. गेल्या आठवड्यात लासूर स्टेशनहून गवळी शिवारला जाणारी बस खड्ड्यात आदळली होती. चालू गाडीचे टायर पडले होते. त्यामुळं चालकानं गाडी जागेवर थांबवून अपघात टाळला होता. याही वेळी बस पटली मारली. पण, प्रवासी बचावले.
अनेकांना किरकोळ जखमा
शिरुरवरून औरंगाबादला परिवहन मंडळाची बस प्रवासी घेऊन दुपारी दोन वाजता जात होती. रस्त्यावरील चिखलामुळं एसटी वाहकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळं बस पलटी झाल्याच सांगितलं जातं. अचानक झालेल्या या अपघातामुळं बसमधील प्रवासी प्रचंड घाबरले होते. अनेकांना किरकोळ जखमा झाल्या. परंतु, सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप आहेत. चालती बस पलटी झाल्यानं नागरिक धावत मदतीला गेले. त्यांनी प्रवाशांना बाहेर काढले. काहींना मुका मार लागला. पण, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसचा वेग हळू होता. शिवाय या रस्त्यावर वाहतूक नव्हती. त्यामुळं मोठा अनर्थ टळला.
पावसामुळं रस्ते चिखलमय
किन्हळ फाट्याजवळ रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्यावर असलेले मुरुम पावसामुळं चिखलात रुपांतरित होते. वाशिम आगारची ही बस होती. चिखलयुक्त रस्त्यावरून बस चालविणे चालकासाठी कसरतीचे काम होते. खड्ड्याचा अंदाज न आल्यानं ही बस पलटली. नागरिकांनी तात्काळ मदत केली. मात्र, पोलीस आणि प्रशासनानं वेळेवर मदत केली नसल्याचा प्रवाशांनी आरोप केलाय.