चंद्रकांत खैरे यांचा सर्वात मोठा दावा, सूर्यनारायणाच्या साक्षीनं सांगतो, संदीपान भूमरे फक्त 8 दिवस…
संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी संदीपान भूमरे फक्त ८ दिवसच राहणार, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय.
दत्ता कनवटे, संभाजीनगर : अवघा महाराष्ट्र सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court) निकालाकडे डोळे लावून बसलाय. कोणत्याही क्षणी निकाल येईल अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shidne) यांच्या खुर्ची कोसळेल, असे दावे केले जातायत. तर दुसरीकडे शिंदे-भाजप सरकार वाचण्यासाठी भल्या-भल्यांनी देव पाण्यात ठेवलेत. राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात संभाजीनगरचे ज्येष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केलाय. संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भूमरे आता फक्त ८ दिवसच पालकमंत्री पदावर राहतील.. तुम्ही लिहून घ्या. मी कधीही खोटं बोलत नाही.. असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय. या वक्तव्याचा नेमका अर्थ काय असं विचारल्यास चंद्रकांत खैरे यांनी पुढचं स्पष्टीकरण दिलं.
भूमरे का ८ दिवस पदावर राहणार?
संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी संदीपान भूमरे फक्त ८ दिवसच राहणार, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय. ‘लिहून घ्या. सूर्यनारायणाच्या साक्षीने सांगतो. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीने सांगतो. पालकमंत्रीपदावर ते फक्त ८ दिवस राहतील..’ मात्र याचं कारण विचारलं असता ते म्हणाले, याचं कारण सर्वांना माहिती आहे. तुम्हीही शोध घ्या. त्याने सव्वा २ कोटी रुपयांची गाडी घेतली. १२ दारूची दुकानं घेतली. एकिकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला निर्व्यसनी होण्याचा सल्ला दिला. ज्या पैठणचे भूमरे हे आमदार आहेत, त्या संतांच्या भूमीत एकनाथ महाराजांनी व्यसनांचे दुष्परिणाम सांगितले. तिथल्याच आमदाराने १२ दारुची दुकानं विकत घेतली आहेत. त्यामुळे लवकरच त्याच्यामागे ईडी लागणार असल्याचं भाकित चंद्रकांत खैरे यांनी वर्तवलंय.
खरंच एकनाथ शिंदे ढसाढसा रडले…
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेला गौप्यस्फोट सध्या चर्चेत आहे. भाजप बरोबर जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे मातोश्रीवर आले होते. माझ्यामागे केंद्रीय तपास यंत्रणा लागू शकतात. यंत्रणांच्या माध्यमातून भाजप मला अटक करू शकते, या भीतीने एकनाथ शिंदे ढसा ढसा रडले होते, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय. यावरून राजकारणात प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनीदेखील या दाव्याला पुष्टी जोडली आहे. आदित्य ठाकरे बोललेत म्हणजे ते खरच आहे. मातोश्रीवरचं कुणीही खोटं बोलत नाही. मलादेखील हा किस्सा माहिती होता, मात्र मी आजवर बोललो नव्हतो, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलय.