मराठवाड्याच्या विकासाला शासनाचे प्रथम प्राधान्य, लवकरच संभाजीनगरमध्ये येणार-मुख्यमंत्री
संत एकनाथ रंग मंदिराच्या वास्तूच्या नूतनीकरण आणि लोकार्पणामुळे औरंगाबादच्या सांस्कृतिक विकासामध्ये अधिक भर पडण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) म्हणाले.
औरंगाबाद : औरंगाबादसह मराठवाड्याच्या विकासाला शासनाने प्राधान्य दिलेले आहे. संत एकनाथ रंग मंदिराच्या वास्तूच्या नूतनीकरण आणि लोकार्पणामुळे औरंगाबादच्या सांस्कृतिक विकासामध्ये अधिक भर पडण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) म्हणाले. संत एकनाथ रंग मंदिराच्या (Sant Eknath mandir) लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ठाकरे बोलत होते. कोविडच्या बंद काळाचा चांगल्याप्रकारे उपयोग करून संत एकनाथ रंग मंदिराचे नूतनीकरण केल्याबद्दल प्रशासनाच्या कार्याचे कौतुक मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. शहराच्या विकासासाठी मुलभूत सोयीसुविधा देताना सिनेमागृहे, उद्याने, नाट्यगृहे (Theaters) यांच्याकडे दुर्लक्ष होते. परंतु सिनेमागृहे, उद्याने, नाट्यगृहे यांची जीवनात आवश्यकता असतेच. शहरातील संत एकनाथ रंग मंदिरातून संत एकनाथ महाराजांनी दिलेला संदेश कलेच्या माध्यमातून सर्वदूर पोहचण्यासाठी मदत होणार आहे. या सेवेचे लोकार्पण झाल्याचा आनंद आहे. असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
विमानतळाच्या नामांतराला लवकरच परवानगी मिळेल
शहरासाठी महत्त्वाचे असलेले गुंठेवारी, नवीन पाणीपुरवठा योजना, पैठण येथे संतपीठ आदीप्रकारचे निर्णय शासनाने घेतलेले आहेत. त्याचबरोबर पैठण येथे सुंदर अशा प्रकारचे उद्यानही शासन करत आहे. विधान मंडळाने औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करून केंद्र शासनाला पाठविलेला आहे. केंद्र शासनही त्यास मान्यता देईल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
पालकमंत्री देसाई यांनी औरंगाबादच्या विकासाला शासनाने नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. कोविड काळात जगभरातील आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली होती. तशीच औरंगाबादलाही या संकटाला तोंड देताना कठीण काळातून जावे लागले. परंतु सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम गतीने पुढे जात आहे. 152 कोटी रूपयांचे रस्ते शहरात झाले आहेत. घनकचऱ्याचे संपूर्ण व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने होते आहे. क्रांती चौकात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा लवकरच विराजमान होत आहे. असेही ते म्हणाले.
खाम नदीचे पुनरूज्जीवन झाले आहे. गुंठेवारीचा ऐतिहासिक असा निर्णय शासनाने घेतल्याने शहरातील दोन लाख घरांना शासनाच्या निर्णयाचा लाभ होतो आहे. त्याचबरोबर शहराच्या विकासात अधिक भर घालण्यासाठी मेट्रो रेल्वेचा डीपीआर तयार करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. अशाप्रकारे अत्याधुनिक सोयीसुविधांनी औरंगाबाद जिल्ह्याची वाटचाल सुरू असल्याचे देसाई म्हणाले. शिवाय, संत एकनाथ रंग मंदिर ज्याप्रमाणे सर्व सोयींयुक्त जनतेच्या सेवेत देण्यात आलेले आहे. त्याचप्रकारे संत तुकाराम नाट्यगृहाचेही नूतनीकरणाचे काम लवकरच करण्यात येऊन त्याचेही लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही देसाई यांनी दिली.