चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणावर डॉ. कराड यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, मुंबईतील भेटीत प्रस्ताव
चिकलठाण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देणे अशा महत्त्वपूर्ण विषयांवर डॉ. कराड आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

औरंगाबाद: केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांनी औरंगाबाद शहरातील विकासकामे आणि राज्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील प्रश्नांवर चर्चा केली. या मुद्द्यांमध्ये औरंगाबाद शहरातील चिकलठाण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Chikalthana International Airport) धावपट्टीचे विस्तारीकरण, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देणे अशा महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता. या मुद्द्यांवर चर्चा करुन त्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
धावपट्टीच्या विस्तारासाठी दक्षिणेकडील जमीन घेण्याचा प्रस्ताव
औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी 182 एकर भूसंपादन होणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया राबवताना बाराशे मालमत्तांना धक्का लागणार आहे. त्यामुळे दक्षिण दिशेकडील शेतजमीन संपादित करावी. जेणेकरून या मालमत्तांना कुठलाही धक्का लागणार नाहीत, अशी मागणी त्यांनी केली. महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आवास योजनेसाठी भागीदारी तत्त्वावर तिसगाव, चिकलठाणा ,कांचनवाडी येथील आवास योजनेसाठी जमीन उपलब्ध करण्यात द्यावीत असा प्रस्ताव गत वर्षी सरकारकडे पाठवल्याचे ते म्हणाले.
80 टक्के खरिपाच्या क्षेत्राचे नुकसान
गुलाब चक्रिवादळामुळे मराठवाड्यात पावसाचा रुद्रावतार पहायला मिळाला. यात मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले. 80 टक्के खरिपाच्या क्षेत्रावर नुकसान झाले आहे. यात मग, कपाशी, सोयाबीन, मका आणि फळबागांना प्रामुख्याने फटका बसला आहे. अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना महत्त्वाची आहे. मात्र राज्य सरकारने विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या हिश्श्याची रक्कम न दिल्यामुळे विमा कंपन्यांकडून विमा देण्यात अडचणी येत आहेत, या समस्येवर यावेळी चर्चा झाली.
आवास योजनेसाठी जागा देण्याची मागणी
औरंगाबाद महानगरपालिकेत पंतप्रधान आवास योजनेसाठी शहरातील 80 हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी घरकुलांसाठी अर्ज केले. त्यापैकी केवळ 30 नागरिकांना या योजनेचा लाभ अद्यापपर्यंत मिळालेला आहे. घरकुल बांधण्यासाठीची आवास योजना चार वर्षांपासून जागेअभावी रेंगाळली आहे. 2022 पर्यंत पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट असून लवकरात लवकर सरकारने जागा उपलब्ध करून दिली तर आवास योजना औरंगाबाद शहरात पूर्ण होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
इतर बातम्या-
Aurangabad: लसीकरण वाढवण्यासाठी मनपाकडे व्हॅक्सिनेटर्सचा तुटवडा, सध्याची केंद्रसंख्या अपुरी
आंध्रप्रदेशातून आलेला 39 किलो गांजा जप्त, तेलगू भाषिक आरोपींची चौकशी करताना औरंगाबाद पोलिसांची अडचण