बीड: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून शेती वाया गेली आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यानंतर हैराण झालेल्या अंबाजोगाई येथील वयस्क शेतकऱ्याने आपल्या लहानग्या नातवासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. एका हातात नातू, दुसऱ्या हातात नुकसानीची मोळी आणि डोळ्यात अश्रू… अशा परिस्थितीत या शेतकऱ्याने जयंत पाटील यांच्याकडे आपली व्यथा मांडली. त्यावेळी जयंत पाटील यांनी या शेतकऱ्याला धीर दिला. घाबरू नका. सरकार तुमच्याबरोबर आहे, असं सांगत जयंत पाटील यांनी या शेतकऱ्याला धीर दिला. (flood affected farmers met jayant patil with damaged crops)
अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची बैठक सुरू आहे. त्यासाठी जयंत पाटील अंबाजोगाई येथे आले होते. ही बैठक सुरू असतानाच कार्यकर्त्यांमधून मार्ग काढत या वयस्क शेतकर्याने जयंत पाटलांची भेट घेतली. पावसाने नुकसान झालेली मोळी घेऊन डोळ्यात अश्रू दाटलेल्या या शेतकर्याने भेट घेतली. हातात नुकसानीची मोळी घेऊन आलेल्या त्या शेतकऱ्याचे म्हणणे जयंत पाटील यांनी ऐकून घेतले व त्यांना घाबरु नका सरकार तुमच्या सोबत आहे, असा धीराचा शब्द दिला.
दरम्यान बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री धनंजय मुंडे हे करत असल्याचेही जयंत पाटील यांनी त्या शेतकऱ्याला सांगितले. शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे शासनाचे कर्तव्य आहे आणि शासन आपले कर्तव्य पूर्ण करत आहे अशा शब्दात त्या शेतकऱ्याला जयंत पाटील यांनी दिलासा दिला.
गेले तीन दिवस मराठवाड्यातील जिल्हयांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्रसरकारच्या कृपेने आधीच सोयाबीनचे भाव पडले आहेत. त्यात आता ही निसर्गाची अवकृपा झाली असून सर्वत्र पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
जालना, परभणी व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून जयंत पाटील यांनी आज सकाळी बीड येथे नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पुराचे पाणी, नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आम्ही करत आहोत. मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जायकवाडी धरणावर देखील आमचे लक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यात तसेच जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात किती पाऊस झाला याची माहिती घेऊन पुढे काय परिस्थिती उद्भवेल याचा अंदाज घेतला जात आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत. जलसंपदा विभाग कालपासून सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. नुकसान कमीत कमी व्हावे हा आमचा प्रयत्न आहे. मांजरा धरणाची देखील दारे उघडण्याची स्थिती उद्भवली आहे. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. (flood affected farmers met jayant patil with damaged crops)
अंबेजोगाई येथील आढावा बैठकीत कार्यकर्त्यांमधून मार्ग काढत हे शेतकरी बांधव माझ्या भेटीसाठी आले होते. त्यांच्या हातात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पिक होते तर डोळ्यात अश्रू. या शेतकरी बांधवाची भेट घेतली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. pic.twitter.com/lhCb25i3no
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 28, 2021
संबंधित बातम्या:
माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती; परळीकरांच्या जंगी सत्काराने जयंत पाटील भावूक
(flood affected farmers met jayant patil with damaged crops)