पंचायत समितीवर पैशांची उधळण, थेट मंत्र्यांकडून ‘त्या’ सरपंचाची दखल, लगेच मोठी कारवाई
"जे निदर्शनास येईल त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही प्रथमदर्शनी बीडीओंना निलंबित केलं आहे. या संदर्भात चौकशी लावलेली आहे", अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एका सरपंचाने पंचायत समितीसमोर पैसे उधळून आंदोलन केल्यानंतर आता अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. फुलंब्री पंचायत समितीसमोर 2 लाखांच्या नोटा उधळत सरपंचाने आंदोलन केलं होतं. विहिरीसाठी अधिकारी पैसे मागत असल्याचा आरोप या सरपंचाने केला. संबंधित गटविकास अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
“मी 20 वर्षे झाले आमदार आहे, मी 20 वर्षे विरोधातही होतो. त्यावेळी आणि आताही मी राज्यभरात पाहतोय की अनेक ठिकाणच्या मागणीच्या गोष्टी पुढे येत आहेत. पैसे मागितले जात आहेत. जास्त लोकांची मागणी आल्यावर तुझा नंबर आधी लावतो, याचा नंबर लावतो या गोष्टी होत आहेत. त्यामुळे या संदर्भात आम्ही अतिशय कठोर पाऊल उचलणार आहोत. जे निदर्शनास येईल त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही प्रथमदर्शनी बीडीओंना निलंबित केलं आहे. या संदर्भात चौकशी लावलेली आहे”, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
सरपंचानं नेमकं काय गऱ्हाणं मांडलं?
फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी आलेले सरपंच मंगेश साबळे यांनी नोटांची उधळण केली. गेवराई पायगा येथील हे अपक्ष सरपंच आहेत. “मी पैसे वाटून निवडून आलेलो नाही. शेतकऱ्यांचं काम करून देण्यासाठी पैसेही वाटू शकत नाहीत, त्यामुळे आज मी अशा प्रकारे व्यथा मांडतोय”, अशी भावना या सरपंचाने व्यक्त केली.
मंगेश साबळे यांनी 2 लाख रुपयांच्या नोटांची उधळण करत आपलं गाऱ्हाणं मांडलं. “पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही भीक मागू, अजून पैसे आणू तुम्हाला देऊ. मी अपक्ष सरपंच झालेलो आहे. कोणत्या तोंडानं शेतकऱ्यांना पैसे मागून काम करायचं? फक्त एखादा सभापती, आमदाराचं ऐकून पैसेवाल्यांच्या विहिरी करणार असाल तर मायबापहो गरीबाचं काम कोण करणार, तुम्ही 20-20 लाख रुपये एका वर्षाला घेता, बारवर नाचणारीवर पैसा फेकला जातो, तो बेवारस असतो असं ऐकलंय, पण हा कष्टाचा पैसा आहे, गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाची किंमत नाही. शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे”, असं सरपंच म्हणतो.
“इथं पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना 50-60 हजार रुपये द्यायचे. यांना पेंशन पायजे. दीड-दीड लाख रुपये पगार आहेत आणि विहिरी मंजूर करायचे पैसे मागतात. मी दोन दिवसांनी सुनिल केंद्रेकरांच्या कार्यालयात जातो, शेतकऱ्यांना सोबत घेऊन अजून पैसे घेऊन जातो. विहिरी मंजूर करून घ्या”, असं गाऱ्हाणं सरपंचांनी मांडलं होतं. मंगेश साबळे यांच्या या अनोख्या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.