गोपीनाथ मुंडे यांची जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी होणार, पंकजा मुंडे यांनी सांगितलं
चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्यानंतर माफी मागितली. त्यानंतरही शाईफेक करणं हे चांगल्या संस्कृतीचं लक्षण नाही.
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्याचं आवाहन केलंय. पंकजा मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. तो सर्व वर्ग गोपीनाथ गडावर पोहचू शकत नाही. गोपीनाथ गड प्रत्येक्ष गावागावात घेऊन जा. परिसरात घेऊन जा, असं आवाहन करण्यात आलंय. वॉर्ड, ग्रामपंचायत, गल्ली बोळात हा कार्यक्रम साजरा करा. फेसबूक आणि झूमच्या माध्यमातून जोडले जाऊ, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. गोपीनाथ गडावरील कार्यक्रम गल्ली बोळात पाहता येईल. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा वर्ग गोपीनाथ गडाशी जोडला जाईल.
१२ डिसेंबर रोजी लोकं गोपीनाथ गडावर येणार आहेत. सोमवारी पंकजा मुंडे या सकाळी गोपीनाथ गडावर जातील. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतील. कीर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. ३० मिनीटांचं मौन बाळगलं जाईल. फेसबूक लाईव्ह आणि झूमच्या माध्यमातून लोकं पंकजा मुंडे यांच्याशी जोडले जातील.
गेल्या काळात देशात आणि राज्यात अप्रिय घटना घडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा अपमान केला गेला. अनेक महामानवांचा अवमान झाला. राजकारणात या महामानवांना ओढण्यात आलं. अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या. निर्घृणपणे भगिनीची झालेली हत्या. अशा अनेक गंभीर घटनांचा निषेध प्रतिकात्मक तिलांजली म्हणून मौन व्रत धारण केलं जाईल, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्यानंतर माफी मागितली. त्यानंतरही शाईफेक करणं हे चांगल्या संस्कृतीचं लक्षण नाही. असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. शब्द मागे घेतल्यावर त्यांना माफ केलं गेलं पाहिजे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. शाईफेक प्रकरण अतिशय गंभीर असल्याचंही त्यांनी सांगितलं.