औरंगाबादः कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ग्रामीण भागात तर ऑनलाइनच्या सुविधांअभावी विद्यार्थी बरेच मागे पडले आहेत, असे स्पष्टीकरण देत MESTA म्हणजेच महाराष्ट्र इंग्लिशन स्कूल ट्रस्टीज असोसिएशन या संघटनेने सरकारला शाळा सुरु करण्याची परवानगी मागितली होती. सरकारचा निर्णय झाला नाही तर आम्ही 17 जानेवारीपासून शाळा सुरु करू, कारवाईलाही सामोरे जाऊ असा इशारा मेस्टा संघटनेने दिला होता. त्यानुसार आज मेस्टा संघटनेअंतर्गत येणाऱ्या विविध शहरांतील तसेच ग्रामीण भागांतील काही शाळा सुरु करण्यात आल्या. औरंगाबादमधील ग्रामीण भागातील जवळपास 250 शाळा सुरु केल्याचा दावा मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी केला आहे. औरंगाबादप्रमाणेच नागपूरमधील 30 ते 40 शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. विविध शहरांतील किती शाळा आज सुरु करण्यात आल्या, याची आकडेवारी लवकरच कळवण्यात येईल, असेही मेस्टाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
MESTA संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तायडे म्हणाले, ‘ घोषणेप्रमाणे ग्रामीण भागातील शाळा सुरु झालेल्या आहेत. बऱ्याच शाळा शहरी भागात आठवीनंतरच्या सुरु झाल्या आहेत. काही शाळांच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. आमच्या कामाची दखल म्हणून खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी आमच्याशी फोनवरून संपर्क साधला. राज्यातील शाळा टप्प्या-टप्प्यानं का होईना सुरु झाल्या पाहिजेत, असं त्यांनी सरकारला दूरध्वनीवरून कळवलेलं आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळेंचे खूप खूप आभार. तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे यांनीदेखील शाळा सुरु करण्यासंदर्भात लवकरच एक बैठक घेऊन, निर्णय घेऊ, असं कळवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचेही आभार. सर्व संस्थाचालकांचेही आभार.”
सध्या तरी आठवी ते दहावीचे वर्ग सुरु करत आहोत, अशी माहिती मेस्टा संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. या वयोगटातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असून त्यांना कोरोनाचा फारसा धोका नाही, असेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील शाळांतील हे वर्ग भरवण्यास काहीच हरकत नाही, असेही मेस्टातर्फे सांगण्यात आले आहे.
मेस्टा संघटनेनं आजपासून शाळा सुरु केल्याचं जाहीर केल्यानंतर मेसा संघटनेनेही याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. शासनाने लवकरात लवकर शाळांबाबत निर्णय घेतला नाही तर 27 जानेवारीपासून या संघटनेअंतर्गतच्या शाळाही सुरु करणार असल्याचं मेसाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
इतर बातम्या-