Accident | नांदेडमध्ये चाललंय काय? जीव गेल्यावरच जागे होणार का? रस्त्यांची निव्वळ खोदाखोदी, बॅरिकेटर अभावी गंभीर अपघात
नांदेडमध्ये रस्ते खोदकामामुळे अश्या स्वरूपाच्या घटना वाढल्याने नागरिकांत संताप व्यक्त केल्या जातोय.
नांदेडः नांदेडमधील वाघाळा महापालिकेने (Waghala Municipal Corporation) शहरात विकास कामांच्या नावाखाली रस्त्यांचे अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. पावसाळा (Monsoon) आला तरी रस्ते दुरुस्तीची कामं आणखी रखडलेलीच आहे. एवढ्या धीम्या गतीनं कामं सुरु आहेत, पण या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय, याचं सोयरसूतकही महापालिका प्रशासनाला (Municipal corporation) नाही. या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून डबके बनलेत. त्यातच कोणत्याही प्रकारचे संरक्षक बॅरिकेटर्स लावलेले नाहीत. त्यामुळे नांदेड रहिवाशांना अक्षरशः जीव धोक्यात घालून येथून मार्गक्रमण करावे लागते. 4 जुलै रोजी रात्री अशीच एक भीषण घटना घडली. यात नांदेचच्या आकाशवाणी केंद्राचे ज्येष्ठ वृत्तनिवेदक गौतम पट्टेबहाद्दूर गंभीर जखमी झालेत.
काय घडली घटना?
नांदेडमध्ये ऐन पावसाळ्यात रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यासाठी शहरांतील बहुतांश रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. रात्री नांदेडमध्ये पाऊस पडत असताना एक दुचाकी अश्याच एका खोदकाम केलेल्या खड्ड्यात कोसळली. पाऊस सुरू असल्याने या खड्ड्याचा दुचाकीस्वाराला अंदाज आला नाही. या अपघातात गौतम पट्टेबहादूर हे गंभीर स्वरूपात जखमी झालेयत. गौतम पट्टेबहादूर हे नांदेडच्या आकाशवाणी केंद्रात जेष्ठ वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत आहेत. या अपघाताची माहिती पोलिसांनी मिळाल्याने त्यांनी वेळेत बचावकार्य करत जखमीला रुग्णालयात हलवलंय. नांदेडमध्ये रस्ते खोदकामामुळे अश्या स्वरूपाच्या घटना वाढल्याने नागरिकांत संताप व्यक्त केल्या जातोय.
पोलीस वेळेवर पोहोचल्याने तत्काळ उपचार
घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक माने सर व पोलीस जमादार प्रकाश मामुलवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संबंधित व्यक्तीचे नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून त्यांना प्रथम उपचार ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले. यामुळे त्यांचा जीव वाचला व सध्या ते ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.