Nanded | कुख्यात गुंड रिंदानं मलाही 10 कोटींची खंडणी मागितली, खा. चिखलीकरांचा खळबळजनक आरोप
नांदेडमधील संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करत खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी आणखी एक खळबळजनक खुलासा केला आहे.
नांदेडः संजय बियाणी (Sanjay Biyani) हत्याकांडाला 15 दिवस उलटूनही अद्याप मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. त्यातच आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करणारा खळबळजनक आरोप भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर (Pratap Chikhalikar) यांनी केला आहे. कुख्यात गुंड/ दहशतवादी रिंदा (Rinda) याने मलाही सात महिन्यांपूर्वी धमकीचे पत्र पाठवले होते. त्यात मला 10 लाखांची खंडणीदेखील मागितली होती. पोलिसांना त्याबाबत सूचना करूनही काहीही कारवाई झालेली नाही. माझ्यासारख्या खासदाराला अशी वागणूक मिळते तर सामान्य लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर आहे, असा आरोप चिखलीकर यांनी केला आहे. संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास आता सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी भापच्या वतीने करण्यात येत आहे. याकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार चिखलीकर यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन करण्यात आले.
डाकू रिंदाचे चिखलीकरांना धमकीचे पत्र
खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करत कुख्यात खंडणीखोर रिंदा याने पाठवलेले पत्र सादर केले. हरविंदर सिंघ संधू असे रिंदा याचे पूर्ण नाव आहे. त्यात त्याने खासदार चिखलीकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली असून आठ दिवसात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यास सांगितले होते. सात महिन्यांपूर्वीचे हे पत्र खासदारांनी आज माध्यमांसमोर उघड केले. सदर धमकीची पोलिसांना सूचना दिली होती, मात्र सदर प्रकरणी काहीही कारवाई झालेली नाही किंवा माझ्या सुरक्षेतदेखील वाढ झालेली नाही. माझ्यासारख्या संसद सदस्याला असे पत्र येऊनही कारवाई झालेली नाही, याबद्दल चिखलीकर यांनी खंत व्यक्त केली आहे.
पत्रातील मजकूर काय?
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दावा केल्यानुसार, त्यांना आलेलं पत्र हे हिंदीतून आहे.या पत्रात नेमकं काय लिहलं आहे, त्याचा मराठी अनुवाद पुढील प्रमाणे-
प्रताप पाटील चिखलीकर माहीत आहे ना मी कोण आहे.जेवढं माझ्या माणसांना सतवसील तेवढंच माझे माणसे तुझ्या घरचे लोक आणि मुलगा या सर्वांचा राम नाम सत्य है… माझ्या माणसाचा फोन येत आहे तुला मारण्यासाठी. माझा माणूस म्हणत आहे 10 करोड रुपये आणून दे. आठ दिवसात. नाही तर तुला माहीत आहे. माझ्या बंदुकीचा टिगर दाबल्यानंतर तू जिवंत राहू शकत नाही. नांदेड मध्य किती लोकांना मारलं आहे हे तर तुला माहीत आहे. औरंगाबाद मध्ये थोड्याने वाचला नाही तर तुझा तिथंच गेम झाला असता.आता माझ्या पासून वाचू शकत नाहीस. मी सांगितलेली रक्कम दे.बदमाशी करू नको पोलिसांना सांगू नको. सांगितलास तर तुझा खेळ खलास.तुझ्या सारख्या मोठ्यांना वर पाठवलं आहे.तुझी काय औकात आहे. इथं दिल्ली मध्ये कितीही सुरक्षा लाव. तुझे चमचे राहतात.त्यांना पण सांगून ठेव.तुला तुझा जीव पाहिजे की मरण हे तू ठरव.माझं पोलीस काहीच करू शकत नाहीत. एका आठवड्यात माझ्या माणसाकडे पैसे दे नाही तर माझी कहाणी माहीत आहे ना…
असा इशारा या पत्रातून दिला आहे.
संजय बियाणींनाही रिंदाची धमकी
नांदेडमधील प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी यालाही पाच वर्षांपूर्वी रिंदा या गुंडानेच खंडणी मागितली होती. त्यानंतर संजय बियाणी यांना पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वी त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. त्यानंतर 05 एप्रिल रोजी बियाणींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. खंडणीच्या अपेक्षेतूनच हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र अद्याप या प्रकरणी पोलिसांना कोणताही महत्त्वाचा धागादोरा हाती लागलेला नाही.
इतर बातम्या-