Osmanabad VIDEO | स्टंटबाजी अंगावर.. गाडीवर पेट्रोल टाकलं अन् भडका उडाला, उस्मानाबादच्या आंदोलनात काय घडलं?
जीवावर बेतणारी स्टंटबाजी (Stunt) केली तर आपल्याच अंगलट येऊ शकते, याचं प्रत्यंतर नुकतंच उस्मानाबादेत (Osmanabad) आलं. उस्मानाबादमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Protest) वतीने महागाईविरोधात आंदोलन करण्यात आलं.
उस्मानाबाद | आपलं आंदोलन अधिक लक्षवेधी करण्यासाठी आंदोलकांकडून अनेकदा विचित्र शक्कल लढवली जाते. कुणी झाडावर चढतो तर टाकीवर चढतो. कुठे कुठे स्टंटबाजीही केली जाते. मात्र जीवावर बेतणारी स्टंटबाजी (Stunt) केली तर आपल्याच अंगलट येऊ शकते, याचं प्रत्यंतर नुकतंच उस्मानाबादेत (Osmanabad) आलं. उस्मानाबादमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Protest) वतीने महागाईविरोधात आंदोलन करण्यात आलं. यात आंदोलकांनी पेट्रोल़-डिझेलचे भाव गगनाला भिडल्याचा निषेध करण्यासाठी मोटरसायकलवर चक्क पेट्रोल ओतलं. त्यावर आगपेटीची काडीही टाकली. मात्र अर्ध्या सेकंदात गाडीने पेट घेतला. सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नाही वा कुणाच्या जीवावर बेतले नाही. मात्र क्षणभराचा हा स्टंट किती भयंकर ठरला असता, याची जाणीव उपस्थितांना झाली.
Osmanabad | स्टंटबाजी अंगावर आली, गाडीवर पेट्रोल टाकलं अन् भडका उडाला, उस्मानाबादच्या आंदोलनात काय घडलं? pic.twitter.com/RgRynlRbuF
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 7, 2022
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रकार
उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसचेही दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी ही डोकेदुखी ठरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. याच डोकेदुखीवर उपाय म्हणून आंदोलकांनी झंडूबामचे वाटप केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैलगाडीत मोटरसायकल टाकून आणली. पेट्रोलचे भाव परवडत नसल्याने असे प्रतिकात्मक आंदोलन त्यांनी केले. मात्र या आंदोलनानंतर अधिक स्टंट बाजी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकलवर पेट्रोल ओतले. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरु होती. इतक्यात कुणीतरी आगपेटीची काडी पेटवली आणि सेकंदाच्या आत गाडीचा भडका उडाला. यामुळे आजूबाजूचे कार्यकर्ते चांगलेच घाबरले. चुकून जरी कुणी गाडीच्या अगदी जवळ असते, तर हे एखाद्याच्या जीवावर बेतले असते.
शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्यांविरोधात आंदोलन
एकिकडे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाविरोधात आंदोलन केले तर जिल्ह्यातील शिवसेनेच्या वतीने भाजपविरोधात आंदोलन करण्यात आले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी जमा केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी घशात घातला. लाखो मुंबईकरांच्या राष्ट्रभावनेशी खेळ करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. शिवसेनेच्या वतीने सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. तसेच या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. आयएनएस विक्रांत युद्धनौकेला वाचवण्यासाठी सोमय्या यांनी निधी गोळा केला, मात्र तो सरकारकडे जमा केला नाही, त्यामुळे त्यांना देशद्रोही म्हणून घोषित करावे, तात्काळ अटक करावी, अशी मागणी शिवसेनेने केली.
इतर बातम्या-