दिवाळीनंतर मणिपूर आणि गोध्रा सारखं कांड होण्याची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांनी उडवली खळबळ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जोपर्यंत गोळवलकर यांच्या पुस्तकाचा निषेध नोंदवत नाही. WE AND THE BROTHERHOOD या पुस्तकाची होळी करत नाही, तोपर्यंत मस्जिद आणि गुरुद्वारात जाण्याला महत्व नाही. हा फक्त देखावा आहे, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 29 सप्टेंबर 2023 : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यात आलेलं नाहीये. तसेच त्यांना महाविकास आघाडीतही घेण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे प्रकाश आंबेडकर चांगलेच चिडले आहेत. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना खरमरीत पत्र लिहून त्याबाबतचा जाबही विचारला आहे. काँग्रेसकडून खरगे यांच्या पत्राला अद्याप उत्तर आलेलं नाहीये. आज पुन्हा एकदा आंबेडकर यांनी काँग्रेसला डिवचलं आहे. तर दिवाळीनंतर मणिपूर आणि गोध्रा सारखं कांड होण्याची शक्यताही आंबेडकर यांनी वर्तवली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला डिवचले आहे. आम्हाला आघाडीत का घेत नाही हे तुम्ही मल्लिकार्जुन खरगे यांना विचारा. आम्हाला विचारायची गरज नाही. आम्ही तर आघाडीचा प्रस्ताव कधीच दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आमची युती आहे. तरीही ते आम्हाला आघाडीत का घेत नाहीत हे त्यांनीच सांगावं. जबरदस्तीने कधी लग्न होत नाही. जबरदस्तीने लग्न केलं तर टिकते का? असा सवालच प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
आजवरच्या मुख्यमंत्र्यांना विचारा
मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारण्यात आलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या दाराशी आला म्हणून तो प्रांतवाद झाला. मी कुठलाही प्रांतवाद आणि जातीयवादाला थारा देत नाही. आम्ही प्रबोधन करत आहोत. मराठी माणसाची संख्या का घटली हे आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना विचारा. मराठी माणूस मुंबईत थांबण्यासाठी काय केलं? हे सुद्धा आजवरच्या मुख्यमंत्र्यांना विचारा, असं सांगतानाच मराठी हौसिंग बनवून मराठी माणसांची संख्या वाढवायला हवी, असा उपायही त्यांनी सांगितला.
सत्ता द्या, मार्ग काढतो
आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली. सध्या लुटारूंचं राज्य सुरू आहे. भाजपने लुटायला सुरुवात केली. ही गँग लुटारूंची आहे, असं सांगातनाच सर्वोच्च न्यायालय बसले आहे. आरक्षण देणार नाही. आंदोलनाचे फलित होणार नाही. मुख्यमंत्री गावातल्या टग्या सारखे करत असून आरक्षण द्या असे मागत आहे. ओबीसींचे 27 टक्के आरक्षण इतर वर्गाला संतुष्ट ठेवू शकते. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता तोडगा काढता येतो. मला सत्ता द्या मी मार्ग काढतो, असं आव्हानच त्यांनी दिलं.
हिंदूंचे राज्य, हिंदूंवरच हल्ले
जैन समाजावर हल्ला होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांच्याकडे सर्व व्यवहार असल्याने त्यांना टार्गेट केले जाणार. जैन मुनी आणि साधूंवर धोका निर्माण झाला आहे. दिवाळीनंतर गोध्रा आणि मणिपूर सारखे कांड होण्याची शक्यता आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. सनातन धर्माचे लोक अफवा पसरवत आहेत. हिंदूंचे राज्य असून हिंदूंवर हल्ला होत आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.