Ramdas Athawale | ‘महिलांना आरक्षण 2024 ला मिळणार नाही, तर….’ रामदास आठवले काय म्हणाले?
Ramdas Athawale | मुस्लिम समाजाला आरक्षण देणं शक्य नाही असं रामदास आठवले का म्हणाले?. मराठा आरक्षणाबद्दलही रामदास आठवले यांनी महत्त्वाच वक्तव्य केलं. दलित पँथरची पुन्हा स्थापना करण्याबद्दल तज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याच त्यांनी सांगितलं.
संभाजीनगर (संजय सरोदे) : नुकतच संसदेच विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. त्यात महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं. अनेक वर्षांपासून रखडलेलं हे महिला आरक्षण विधेयक दोन दिवसात मंजूर झालं. “महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं असलं, तरी महिलांना आरक्षण 2024 ला मिळणार नाही, तर 2029 मध्ये महिलांना आरक्षण मिळेल” असं रिपाई नेते रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. “दलित पँथरची पुन्हा स्थापना करायची का? याबाबत तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. दलित समाजावर आजही ग्रामीण भागात अन्याय होतो. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीला विरोध केला जातो” असं रामदास आठवले म्हणाले.
“सामाजिक ऐक्य होणे आवश्यक आहे. राज्य सरकारने दलित समाजावर होणाऱ्या अत्याचाराचा आढावा घेतला आहे. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, की राहिलेला मंत्री मंडळ विस्तार करावा. एकनाथ शिंदे राजीनामा देतील या अफवा आहेत” असं रामदास आठवले म्हणाले. “लोकसभा आणि विधानसभा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार. अजित पवार आमच्यासोबत आले, याचा आनंद झाला आहे” असं रामदास आठवले यांनी सांगितलं. मुस्लिम समाजाला आरक्षण देणे शक्य नाही, असं आठवले का म्हणाले?
“मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी मी मागणी केली आहे. मराठा समाजातील गरीब कुटुंबाला आरक्षण मिळालं पाहिजे. मुस्लिम समाजाला आरक्षण देणे शक्य नाही, कारण ओबीसीमध्ये मुस्लिम समाज आरक्षणाचा लाभ घेत आहे” असं रामदास आठवले यांनी सांगितलं.