लेखक अरविंद जगताप यांच्या वडिलांचा जंगी वाढदिवस, 75 देशी वृक्षांची बीजतुला, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदेंची उपस्थिती
औरंगाबादमध्ये एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलं. चित्रपट लेखक अरविंद जगताप, सयाजी शिंदे आणि मकरंद अनासपुरे या तिघांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला होता.
औरंगाबादः प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांचे वडील गणपतरावजी जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज औरंगाबादमध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गणपतरावजी जगताप यांची बीजतुला करण्यात आली. तसेच वृक्षारोपणही करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाला सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) आणि सयाजी शिंदे (Sayaji Shinde) हेही उपस्थित होते. गणपतरावजी जगताप यांची यावेळी वाजत गाजत मिरवणूक देखील काढण्यात आली.
75 देशी वृक्षांच्या बीजांनी तुला
या कार्यक्रमात गणपतरावजी जगताप यांची तुला करताना 75 प्रकारच्या देशी वृक्षांच्या बियाणांचा वापर करण्यात आला. आता तुलेत वापरलेल्या या बीजांचे वृक्षारोपण विविध संस्था आणि व्यक्तींमार्फत केले जाईल. त्यानंतर या कार्यक्रमात मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं.
तलवारीने केक कापण्याऐवजी वृक्ष लावा
या कार्यक्रमात मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांनी उपस्थितांना वृक्षाचे महत्त्व समजावून सांगितले. तलवारीने केक कापण्याऐवजी वृक्ष लावून वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन अरविंद जगताप यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने वृक्षप्रेमी उपस्थित होते.
इतर बातम्या-