दारुची बाटली द्या, नाही तर खालीच येणार नाही, औरंगाबादेत दारूड्याचा टॉवरवरूनच धिंगाणा, अखेर…
रविवारी हे नाट्य घडल्यानंतर पुन्हा एकदा याच दारुड्यानं सोमवारी टॉवरवर चढून गोंधळ घातला. यावेळी दारूची बाटली नाही तर दारुबंदीसाठी आपण आंदोलन करत असल्याचं म्हणू लागला.
औरंगाबादः वाईन धोरणावरून (Wine Policy) राज्य सरकारला विरोधा पक्षानं वेठीला धरलं आहे. पण औरंगाबादमध्ये (Aurangabad District) एका दारुड्यानं दारुची बाटली मिळावी म्हणून अख्ख्या गावालाच वेठीस धरलं. तेदेखील एक नाही तर सलग दोन दिवस त्यानं हा ड्रामा केला. घरचे दारू देत नाहीत म्हणून पठ्ठ्या मोबाइलच्या टॉवरवरच (Mobile Tower) चढून बसला. कुणी तरी दारूची बाटली आणून द्या, नाही तर मी येथून खाली उडी मारेन, असा धिंगाणा सुरु केला. दारुड्याची ही अजब मागणी पाहून नागरिकांना आश्चर्य वाटू लागले. कुणाला राग आला तर कुणी त्याला वेड्यात काढू लागले. पण हा माणूस दारु द्या म्हणून हट्टालाच पेटला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड गावातली ही घटना आहे.
कुठं घडली घटना?
औरंगाबादमधील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत पाचोड येथे असलेल्या भारतीय संचार निगम लिमिटेडच्या टॉवरवर रविवारी हा माणूस चढून बसला. येथील भारतीय संचार निगमच्या कार्यालयात हे टॉवर आहे. तेथे दोन ते तीन तास या माणसाने गोंधळ घातला. दारुची बाटली द्या, तेव्हाच खाली येतो, असे म्हणू लागला. हट्टाला पेटलेल्या या माणसाचा ड्रामा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली. अखेर दारू देतो, असं आश्वासन दिल्यानंतर तो खाली उतरला.
सोमवारी दारुबंदीच्या मागणीसाठी टॉवरवर
रविवारी हे नाट्य घडल्यानंतर पुन्हा एकदा याच दारुड्यानं सोमवारी टॉवरवर चढून गोंधळ घातला. यावेळी दारूची बाटली नाही तर दारुबंदीसाठी आपण आंदोलन करत असल्याचं म्हणू लागला. गावातील दारु बंद करा तेव्हा मी खाली उतरतो, असे म्हणू लागला. टॉवरच्या शेवटच्या टोकापर्यंत गेला. त्याने एवढी दारु घेतली होती की, बोलताही येत नव्हते. अखेर काही वेळाने तो खाली उतरला. मात्र दोन दिवस चाललेल्या या नाट्यामुळे बघ्यांचं मनोरंजन झालं.
इतर बातम्या-