तोंडोळी दरोडाः म्होरक्यासह एकाला बेड्या, 5 अद्याप फरार, आरोपींकडे मोबाइल नसल्याने लोकेशन शोधण्याचे आव्हान!
पैठण तालुक्यातील बिडकीजवळील तोंडोळी येथील शेतवस्तीवर मध्य प्रदेशातील कुटुंबावर 19 ऑक्टोबर रोजी दरोडा पडला होता. यात लूटमारीसोबत दोन महिलांवर बलात्कारही करण्यात आला होता.
औरंगाबादः मराठवाड्यातील ग्रामीण भागाला हादरवून सोडणाऱ्या तोंडोळी (Tondoli Robbery) येथील घटनेचा औरंगाबाद पोलीस (Aurangabad police) पथकाकडून कसून तपास करण्यात ये आहे. या दोन दिवसांपूर्वी या घटनेतील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले होते. आता शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Crime branch, Aurangabad) पोलिसांनी वेषांतर करुन अमहदनगर जिल्ह्यातील कोपरगावन येथे दुसऱ्या एका आरोपीला अटक केली. विजय प्रल्हाद जाधव असे (38, रा, ढोरकिन) या आरोपीचे नाव आहे.
म्होरक्या प्रभू पवारला बेड्या
तोंडोळी येथे तसेच परिसरातील इतरही शेतवस्तींवर दरोडा टाकणाऱ्या या टोळीचा शोध घेण्यासाठी चार जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी कामाला लागले होते. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना मुख्य आरोपी प्रभू श्यामराव पवार यास बेड्या ठोकण्यात यश मिळाले. आरोपीच्या कबुलीनंतर टोळीतील इतर सहा जणांचा पोलीस शोध घेत आहेत. पकडण्यात आलेला दुसरा आरोपी विजय जाधव हा कोपरगाव येथील सासुरवाडीत लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्याठिकाणी ऊसतोड मजूर म्हणून चौकशी केली आणि आरोपीची खात्री पडल्यावर सापळा रचून अचानक घरात जाऊन त्याला पकडले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव, अंमलदार वाल्मीक निकम, रावेश्वर धापसे आणि संजय तांदळे यांनी केली.
आरोपींकडे मोबाइल नसल्याने अडचण
तोंडोळी घटनेतील सर्वच आरोपींची ओळख पटली आहे. सात आरोपींपैकी दोघे पोलिसांच्या हाती लागले आहेत. टोळीचा म्होरक्या प्रभू पवार आणि आणखी एक विजय जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरीत पाच जण अद्याप फरार आहेत. विशेष म्हणजे यातील एकही आरोपी मोबाइल वापरत नसल्यामुळे लोकेशन मिळवण्यात अडचणी येत आहेत. मात्र लवकरच सर्व आरोपी पकडले जातील, असा विश्वास ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
19 ऑक्टोबर रोजी पडला होता दरोडा
पैठण तालुक्यातील बिडकीजवळील तोंडोळी येथील शेतवस्तीवर तीन महिन्यांपासून मध्य प्रदेशातील कुटुंब राहण्यास आले होते. यात तीन पुरुष व चार महिला होत्या. दरोडेखोरांनी 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारी मध्यरात्री कुटुंबावर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. दरोडेखोरांनी कुटुंबातील पुरुषांना बाजूच्या खोलीत हातपाय बांधून कोंडले, तर बाहेर एकाच्या गळ्याला चाकू लावून चारपैकी दोन महिलांवर चौघांनी सामूहिक अत्याचार केला. यातील पीडिता 31 आणि 32 वर्षीय असून, त्यांना दरोडोखोरांनी घराच्या बाजूला नेत अत्याचार केले. घरातील पुरुषांना शस्त्रांचा धाक दाखवून आधीच बांधून ठेवले होते त्यामुळे ते प्रतिकार करू शकले नाहीत. एकाने मुकाबला करण्याचा प्रयत्न केला असता त्याला गंभीर मारहाण करण्यात आली. तोंडोळी येथील या घटनेत दरोडेखोरांनी रोख 36 हजार आणि बनावट दागिने लंपास केले. तोंडोळी दरोड्यात दरोडेखोरांनी ज्या दोन महिलांवर बलात्कार केला, त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. यापैकी एक महिला 15 दिवसांची बाळंतीण असल्याचे उघड झाले.
इतर बातम्या-