चिकलठाण्यातील कोविड सेंटरची चोरट्यांकडून तोडफोड, सीसीटीव्ही फोडले, नळाच्या तोट्याही पळवल्या
मंगळवारी उघडकीस आलेल्या या घटनेत अज्ञातांनी येथील सीसीटीव्ही आणि डीव्हीआरची तोडफोड केली. रुमचे दरवाजे तोडले. वॉशबेसिनच्या भांड्यांची तोडफोड करून तोट्या काढून नेल्या. लोखंडी कपाट उचकटून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले.

औरंगाबाद: मागील तीन महिन्यांपासून बंद असलेल्या चिकलठाणा औद्योगिक (Chikalthan Industrial Residency) वसाहतीतील सिपेट कोविड सेंटरमध्ये तोडफोड झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर महानगर पालिकेने या सेंटरला कुलूप लावले होते. मात्र मंगळवारी तेथील अज्ञातांनी या सेंटरमध्ये चांगलाच धुडगूस घातल्याचे समोर आले.
सीसीटीव्ही फोडले, नळाच्या तोट्या नेल्या
मंगळवारी उघडकीस आलेल्या या घटनेत अज्ञातांनी येथील सीसीटीव्ही आणि डीव्हीआरची तोडफोड केली. रुमचे दरवाजे तोडले. वॉशबेसिनच्या भांड्यांची तोडफोड करून तोट्या काढून नेल्या. लोखंडी कपाट उचकटून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. इलेक्ट्रिक वायरिंग, संगणकासह टेबल खुर्च्यांचीही तोडफोड केली. काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असला तरीही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मंगळवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी या परिसराची पाहणी केली.
सुरक्षारक्षकाविना बेवारस होते कोविड केंद्र
सिपेड कोविड सेंटरला रुग्णालयाचे स्वरुप देण्यात आले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधाही तेथे उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यावेळी इथे सुरक्षारक्षकही होते. मात्र रुग्णसंख्या कमी होताच, मनपाने सेंटरला तीन महिन्यांपूर्वी टाळे लावले होते. येथील सुरक्षारक्षकही काढून घेतले. त्यामुळे बेवारस झालेल्या या केंद्रात अज्ञातांनी तोडफोड करून साहित्याची चोरी केली.
या चोरी दरम्यान लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे उघडकीस येत आहे. दरम्यान, मंगळवारी नोडल अधिकारी डॉ. अंजली पाथ्रीकर यांच्या तक्रारीनरून एमआयडीसी चिकलठाणा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
डेंग्यूच्या नव्या स्ट्रेनमुळे आरोग्य यंत्रणेवर दबाव
देशातील 11 राज्यांमध्ये डेंग्यूचा नवीन स्ट्रेन अधिक धोकादायक ठरू शकतो, अशा इशारा केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत दिला. यात महाराष्ट्र राज्याचाही समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी डेंग्यू प्रसाराचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्यात केवळ औरंगाबाद शङरात मागील 20 दिवसांत संशयित 68 तर डेंग्यू पॉझिटिव्ह असे 46 रुग्ण सापडले. डेंग्यूच्या नव्या स्ट्रेनच्या अलर्टमुळे शहरातील आरोग्य यंत्रणेचीही झोप उडाली आहे.
इतर बातम्या-
औरंगाबाद मनपाची करवसुली कासवगतीनं, मागील पाच महिन्यात फक्त 15 टक्केच वसुली, थकबाकीचा आलेख चढताच!!