वीजेच्या लपंडावामुळे घरगुती उपकरणे जळाली, लासूरमध्ये महिलांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा
या परिसरातील ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे वीजेचा पुरवठा खंडीत होण्याची समस्या आहे. मात्र नागरिक हिटर, शेगडी, गिझरचा अतिवापर करतात, असे स्पष्टीकरण अभियंत्यांनी दिले.
औरंगाबाद: शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरु आहे. सतत वीज गायब होते. काही सेकंद वीज राहते तर लगेच पुरवठा खंडीत होतोय. यामुळे वीजेवर चालणाऱ्या उपकरणांमध्ये बिघाड होतोय. याच त्रासाला कंटाळून औरंगाबादजवळच्या लासूर (Lasur station, Aurangabad) स्टेशन भागातील हौसिंग सोसायट्यांमधील महिलांनी महावितरणच्या (MSEDCL ) कार्यालयावरच हल्लाबोल केला. शुक्रवारी महिलांनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
फ्रीज, टीव्ही, मिक्सर जळाल्याची तक्रार
वीजेचा अतिरिक्त दाब, वीजेचा लपंडाव तसेच वारंवारच्या अपडाऊनमुळे अनेक घरातील फ्रीज, टीव्ही, मिक्सर, कॉम्प्यूटर, एसी जळाल्याची तक्रार लासूर परिसरातील महिलांनी केली. महावितरणला लेखी आणि तोंडी निवेदने देऊनही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतल्याचा आरोपही महिलांनी केला. त्यामुळे शुक्रवारी या परिसरातील महिलांनी एकत्र येत थेट महावितरण कार्यलयावर मोर्चा काढला. सायंकाळपर्यंत स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्यावर आंदोलक महिलांनी आंदोलन आवरते घेतले.
आकडेबहाद्दर ग्रामस्थांवरही कारवाई करणार- अभियंता
या परिसरातील ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे वीजेचा पुरवठा खंडीत होण्याची समस्या आहे. मात्र नागरिक हिटर, शेगडी, गिझरचा अतिवापर करतात. या अतिदाबामुळेच ट्रान्सफॉर्मर जळतात. दोन दिवसांपूर्वीच100 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसवला होता. मात्र अतिदाबामुळे पुन्हा तोही जळाला. आता नवा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येईल. त्यानंतर आकडेबहाद्दर ग्रामस्थांवर कारवाई करणार आणि कायदेशीर गुन्हाही दाखल करणार, असा माहितीवजा इशारा कार्यकारी अभियंत्यांनी दिला.
नियमित बील भरणाऱ्यांना का त्रास?
ज्या वीज ग्राहकांच्या घरी बेकायदेशीर शेगडी, हिटर, गिझर यांचा वापर होतो, वर कारवाई झालीच पाहिजे. मात्र जे ग्राहक नियमित वीजबिल भरतात, त्यांच्यावरही विनाकारण अन्याय होतो. अतिदाबामुळे घरातील उपकरणे जळाली आहेत. याची भरपाई कोण करणार असा सवाल आंदोलक महिलांनी केला आहे.
औरंगाबाद शहरात अंगणवाडी सेविकांनी काढली मोबाइलची अंत्ययात्रा
दरम्यान, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांना शासनाने दिलेले मोबाइल वारंवार नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या ऑनलाइन कामात सतत व्यत्यय येतो. म्हणून अंगणवाडी कर्मचारी युनियन-आयटकच्या वतीने शुक्रवारी खराब झालेल्या मोबाइलची अंत्ययात्रा काढत जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. दुपारी अडीच ते सायंकाळी सहापर्यंत आंदोलकांनी येथे ठिय्या आंदोलन केले. तसेच ‘हमारा मोबाइल अमर रहे’ अशा घोषणा देत मोबाइलला अखेरचा निरोप देत शोकसभाही आयोजित केली. (Women’s agitation in front of MSEDCL office in Lasur Aurangabad due to continuous power outage)
इतर बातम्या-
Aurangabad | औरंगाबादमध्ये आरोग्य विभागाची परिक्षा रद्द झाल्याने एसटीत विद्यार्थ्यांच्या घोषणा