बीडमध्ये मराठवाडा स्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचा थरार, औरंगाबादची श्रुती विजयी, 2 किलो चांदीची गदा पटकावली
बीडमध्ये पैलवान ग्रुप कडून मराठवाडा स्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. बीडच्या इतिहासात पाहिल्यांदाच महिला कुस्ती भरविण्यात आली होती. स्पर्धेत औरंगाबादची श्रुती ही महिला मल्ल विजयी झाली.
बीडः बीडमध्ये पैलवान ग्रुप कडून मराठवाडा स्तरीय महिला कुस्ती (Woman Wrestling ) स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. बीडच्या इतिहासात पाहिल्यांदाच (Sports) महिला कुस्ती भरविण्यात आली होती. या स्पर्धेला महाराष्ट्रातून महिला पैलवानांनी सहभाग नोंदविला होता. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदानावर पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेला बीडकरांनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेत तब्बल 351 महिला पैलवानांनी सहभाग नोंदवला.
दोन किलो वजनाची चांदीची गदा
या स्पर्धेत बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, सोलापूर, धुळे, वाशीम, हिंगोली, सातारा, यवतमाळ, भंडाऱ्यासह इतर जिल्ह्यांतील महिला मल्ल सहभागी झाल्या. त्यांना 2 लाख 51 हजार रुपयांपर्यंतची बक्षीसे देण्यात आली. तर प्रथम विजेत्याला 2 किलो चांदीची गदा देण्यात आली.
औरंगाबादची पैलवान श्रुती विजयी घोषित
स्पर्धेच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत औरंगाबादची पैलवान श्रुती बामणवत आणि सानिका पवार यांच्यात अंतिम लढत झाली. यात श्रुती बामणवत विजयी झाली. श्वास रोखून धरायाला लावणारा हा सामना 18 मिनिटे चालला. यावेळी राष्ट्रीय पदक विजेते तथा पुण्याचे डीवायएसपी राहुल आवारे यांची प्रमुख उपस्थिती होती. विजयी श्रुती हिला 2 किलो वजनाची चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली.
कोरोनाच्या संकटात नियमांचे उल्लंघन
सध्या ओमीक्रॉनचा विळखा घट्ट होत असताना बीडमध्ये मात्र कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयोजकांसह नागरिकांना मास्क आणि सोशल डिस्टनसिंगचा विसर पडल्याचे पहावयास मिळाले. राज्यातील अनेक जिल्ह्यात निर्बंध म्हणून सर्वच कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली असली तरी बीडमध्ये मात्र अशा सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतेय.
इतर बातम्या-