‘साहेब घरचं चांगलंय, 8-9 एकर जमीन, पण कुणी मुलगीच देईना’, वैतागलेल्या तरुणाचा थेट आमदाराला फोन
ग्रामीण भागातल्या तरुणांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर बनलाय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका तरुणानं लग्नासाठी चक्क आमदारांनाच साकडं घातलंय. लग्नासाठी मुलगी पाहण्याची विनंती त्यानं आमदार उदयसिंह राजपूतांना केलीय.

औरंगाबाद : कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंह राजपूत (Uday Singh Rajput) यांच्याकडे एका तरुणानं चक्क आपल्याला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची तक्रार केलीय. घरी जमीन-जुमला आहे, शोतीतून मिळणारं उत्पन्न मुबलक आहे. पैसापाणी आहे. तरीही लग्नासाठी मुली मिळत नाहीत, अशी तक्रार तरुणाची आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर लग्नाळू तरुणांचा अभूतपूर्व मोर्चा निघाला होता. लग्नासाठी मुली मिळत नसलेल्या अस्वस्थ तरुणांनी हा मोर्चा काढला होता. सजूनधजून, घोड्यावर बसून, वाजंत्री वाजवत हे तरुण जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते.
लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा खूप जास्त वाढल्याचं तरुणांचं म्हणणं आहे. मुलाला नोकरी असावी, मुलगा शहरातच नोकरी करणारा असावा, शहरात स्वत:चं घर किंवा फ्लॅट असावा, शक्यतो एकत्रित कुटुंब नसावं, शहरात नोकरी असेल तरी मुलाला गावाकडे जमीनजुमला असावा, मुलगा दिसायला देखणा हवा. मुलगा मुलीच्या आईवडिलांची काळजी करणाराही असावा, अशा मागण्या मुली करु लागल्या आहेत.
त्यामुळं शेतकरी मुलांची लग्नं होणं अवघड झालंय. मुलांना मुली न मिळण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे लिंग गुणोत्तर. सध्या महाराष्ट्रातलं लिंग गुणोत्तर 1 हजार मुलांमागे 920 मुली इतकं आहे. याचा अर्थ हजारातली जवळपास 80 मुलं अविवाहीतच राहणार.
पहिल्या काळात लग्न ठरवण्यासाठी कुठल्याही विवाह संस्थेची गरज नसायची.पण अलीकडे गल्लीबोळात विवाह नोंदणी संस्था निर्माण झाल्या आहेत.
काही लग्नाळू तरुणांची आर्थिक फसवणूक करणारे दलालही निर्माण झाले आहेत. एवढं होऊनही लग्न ठरत नसल्यानं तरुणाई अस्वस्थ झालीय. आधी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. आणि आता लग्नासाठी थेट आमदारालाच साकडं घालण्याचा प्रकार झालाय.
आमदार आणि तरुण यांच्यात नेमकं संभाषण काय?
विजय होळकर- हॅलो आ.उदयसिंह राजपूत- हॅलो विजय होळकर- हॅलो साहेब जय महाराष्ट्र आ. उदयसिंह राजपूत- जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र विजय होळकर- रत्नापूरवरुन बोलतोय साहेब, विजय होळकर, ग्रामीणमधून आ. उदयसिंह राजपूत- बोला, बोला ना विजय होळकर- काय निवांत होते का साहेब? आ. उदयसिंह राजपूत- नाही बसलो होतो..बोला..बोला ना विजय होळकर- साहेब असा विषय होता. घरी चांगलं आहे आपल्या, एवढी काय वाईट परिस्थिती नाही. 8-9 एकर जमीन आहे. पण साहेब इकडं कुणी मुलगीच द्यायला तयार नाही साहेब. आ. उदयसिंह राजपूत- कुठं? विजय होळकर- आपलं रत्नापूर म्हणजे खुलताबाद भद्रा मारुती आ. उदयसिंह राजपूत- तुमचा बायोडाटा पाठवून द्या विजय होळकर- बायोडाटा म्हणजे. रत्नापूरपासून खाली फुलंब्री रोडनं खाली 6 किलोमीटरवर गाव आहे आ. उदयसिंह राजपूत- बायोडाटा पाठवून द्या विजय होळकर- परिस्थिती चांगली आहे साहेब पण आ. उदयसिंह राजपूत- बायोडाटा पाठवून द्या विजय होळकर- विकासभाऊच्या याच्यावर पाठवू का? आ. उदयसिंह राजपूत- पाठवून द्या. पाठवून द्या विजय होळकर- विकासभाऊचा नंबर आहे माझ्याकडे व्हॉट्सअॅपचा. तुमचा हाच नंबर आहे का? आ. उदयसिंह राजपूत- पाठवून द्या. पाठवून द्या विजय होळकर- तुमच्या कन्नड सर्कलमध्ये भरपूर मुली आहेत साहेब आ. उदयसिंह राजपूत- बरं बरं..ठीक आहे..बोलतो बोलतो