औरंगाबाद ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीच्या शाळा आजपासून सुरू, पोळ्यामुळे विद्यार्थी नाहीत, पण सॅनिटाझेशनला सुरुवात
ज्या शिक्षकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शाळेत येण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना तपासणीदेखील केली जाईल. सध्या शाळेचे निर्जंतुकीकरण सुरु आहे.
औरंगाबाद: मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात येऊन शिक्षण घेण्याच्या प्रवाहापासून दूर आहेत. मात्र आज सोमवार दिनांक 06 सप्टेंबरपासून औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. संपूर्ण कोरोनामुक्त असलेल्या गावांमध्ये आजपासून शाळा सुरु होणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे (Nilesh Gatane) यांनी केली होती. त्यानुसार जिल्हाभरातील शाळांमध्ये अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील 57 गावांमध्ये अजूनही कोरोनाचे सक्रीय रुग्ण असल्यामुळे त्या गावातील शाळा सध्या तरी सुरु करता येणार नाहीत. तसेच शाळा सुरु झाल्यावर एखाद्या गावात कोरोना रुग्ण आढळला तर तेथील शाळा पुन्हा लगेच बंद करण्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गावात बैलपोळा, विद्यार्थी उद्यापासून येणार
सोमवारचा मुहूर्त साधत पाचवी ते सातवीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असला तरीही बैलपोळ्यामुळे विद्यार्थी मात्र शाळेकडे फिरकले नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा केला जातो. यावेळी संपूर्ण गाव एकत्र येऊन बैलांची मिरवणूक काढली जाते. त्यामुळे आजच्या दिवशी तरी विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, याची पूर्ण कल्पना शाळांनाही आली.
आज सॅनिटायझेशन अन् सजावट
जिल्हा परिषदेच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येऊन शिकण्याची परवानगी सोमवारपासून मिळालेली आहे. मात्र आज शाळांची पूर्णपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले जात आहे. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनाही शाळेत येण्यास उत्साह आला पाहिजे, म्हणून शिक्षकांकडून शाळेची सजावटी केली जात आहे. जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग आधीपासूनच सुरु आहेत. आता कोव्हिडच्या नियमांचे पालन करुन त्याआधीचे वर्ग सुरु केले आहेत.
गुरुजींचे दोन्ही डोस पूर्ण असणे आवश्यक
शाळा सुरु होण्यापूर्वी ज्या शिक्षकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शाळेत येण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना तपासणीदेखील केली जाईल. जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या शिक्षकांची एकूण संख्या 17 हजार 322 असून दोन्ही डोस घेतलेल्या शिक्षकांची एकूण संख्या 12 हजार 804 एवढी आहे.
28 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
दरम्यान, जिल्हा परिषदेतर्फे रविवारी शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील 28 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोरोना काळात सेवा देणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्षा मीना शेळके, उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, शिक्षण सभापती अविनाश गलांडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
इतर बातम्या: