Nagar panchayat Elections : नगरपंचायतींसाठी सरासरी 81 टक्के मतदान, तुमच्या गावात किती टक्के मतदान? वाचा सविस्तर
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 93 नगरपंचायतींमधील (Nagar panchayat Elections) 336 जागांसाठी आज सरासरी 81 तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अदाज आहे.

मुंबई : आमदार, खासदारकीच्या निवडणुकीपेक्षाही जास्त प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडले आहे, सर्वांना उद्याच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 93 नगरपंचायतींमधील (Nagar panchayat Elections) 336 जागांसाठी आज सरासरी 81 तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अदाज आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या (Panchayat raj Elections results) सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार विविध महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज मतदान झाले. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजितपणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले. याच्या निकालाची सर्वात वेगवान अपडेट आम्ही तुम्हाला उद्या देणार आहोत.
कुठली आकडेवारी काय सांगते?
राज्य निवडणूक आयोगाने एकूण 106 नगरपंचातींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यातील तलासरी, विक्रमगड, मोखाडा, पेठ, सुरगाणा, धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, झरी- जामणी, मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले. उरलेल्या 95 नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार होते. त्यापैकी शिर्डीतील 4 आणि आणि कळवणमधील 2 जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी आज मतदान झाले.
उद्या मतमोजणीला सुरूवात होणार
भंडारा जिल्हा परिषदेच्या 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 10; तसेच या दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समित्यांतील 45 जागांसाठीदेखील आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 73 टक्के मतदान झाले. त्याचबरोबर विविध जिल्ह्यांतील 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 76 टक्के मतदान झाले. सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीसुद्धा प्राथमिक अंदाजानुसार 50 टक्के मतदान झाले. या सर्व ठिकाणी उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरूवात होईल. निकालाची सर्वात वेगवान अपडेट तुम्हाला टिव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर मिळणार आहे.