तब्बल 12 तोळं सोनं त्याच्या रिक्षात पडून होतं, त्याची नियत..
एकीकडे दरोडे, चोरी अशा गुन्ह्यांच्या घटना वाढत असतानाच अशा काही वेगळ्या घटनांमुळे प्रामाणिकपणा , माणूसकी हे गुण अजूनही जिवंत असल्याचं सुखद चित्र दिसतंय. आता अशीच एक घटना बदलापूरमध्येही समोर आली आहे, जिथे एका रिक्षावाल्याने त्याच्या रिक्षात मिळालेलं तब्बल 12 तोळं सोनं...

बदलापूर | 23 डिसेंबर 2023 : काही दिवसांपूर्वीच कल्याणमधील एका प्रामाणिक रिक्षावाल्याने एका महिलेचे 7 तोळ्यांचे दागिने असलेली बॅग तिला परत केली होती. त्याच्या प्रामाणिकपणाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं. पोलिसांनीही त्याला शाबासकी दिली होती. एकीकडे दरोडे, चोरी अशा गुन्ह्यांच्या घटना वाढत असतानाच अशा काही वेगळ्या घटनांमुळे प्रामाणिकपणा , माणूसकी हे गुण अजूनही जिवंत असल्याचं सुखद चित्र दिसतंय. आता अशीच एक घटना बदलापूरमध्येही समोर आली आहे, जिथे एका रिक्षावाल्याने त्याच्या रिक्षात मिळालेलं तब्बल 12 तोळं सोनं परत करत प्रामाणिकपणा दाखवला आहे.
रिक्षातून प्रवास करताना एक महिला बॅग विसरली होती. या बॅगेत सोन्याचे लाखो रुपयांचे दागिने होते. मात्र त्या रिक्षा चालकाला ही बॅग मिळाल्यावर त्याने त्याची हाव न बाळगता उलट ती बॅग तिच्या मूळ मालकिणीकडे, त्या महिलेकडे परत केली. त्यामुळेच रिक्षा चालक मालक संघटना आणि वाहतूक विभाग पोलिसांकडून रिक्षा चालक अजय पाटेकर यांचा सत्कार करण्यात आला आहे. या बॅगमध्ये थोडंथोडकं नव्हे तर तब्बल 12 तोळं सोनं होतं.
नातेवाईकांच्या लग्नासाठी निघाले, पण दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरले आणि…
बदलापूरच्या दत्तवाडीत परिसरात राहणाऱ्या वनिता पाथरे ही महिला कुटुंबासह मुंबईत एका लग्नासाठी जात होती. बदलापूर स्टेशनला जाण्यासाठी त्यांनी दत्तवाडी परिसरातून रिक्षाने प्रवास करून बदलापूर रेल्वे स्थानक गाठलं आणि त्या खाली उतरल्या. पण थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं की एक बॅग त्या रिक्षातच विसरल्या आहेत. आणि त्या बॅगमध्येच त्यांचे सर्व लाखो रुपयांचे दागिने होते. पण तोपर्यंत ती रिक्षा निघून गेली होती. भांबावलेल्या, भेदरलेल्या वनिता यांना काय करावं , सुचेनासंच झालं. अखेर चिंतातूर पाथरे कुटुंबियांनी बदलापूर पूर्व रिक्षा चालक मालक युनियनचे अध्यक्ष किशोर देशमुख यांना गाठलं आणि सगळा प्रकार सांगितलां.
त्यावर देशमुख यांनी तत्काळ इतर सर्व रिक्षा चलाकांना याबाबत सतर्क केलं आणि काही वेळातच त्या रिक्षाचालाकला शोधून काढले. रिक्षा चालक अजय पाटेकर यांच्याशी संपर्क साधल्यावर , त्यांनी ती बॅग आपल्या रिक्षातच असल्याचे प्रामाणिकपणे सांगितले. ती ब२ग परत करण्याासठी मीच त्या महिलेचा शोध घेत होतो, असेही त्यांनी नमूद केले. तेवढ्यात रिक्षा चालक मालक युनियनच्या अध्यक्षांचा फोन आला आणि पाटेकर यांनी आपण ती बॅग युनियनच्या कार्यालयात ठेवणारच असल्याचे त्यांना सांगितले.

प्रामाणिक रिक्षाचालकाचा पोलिसांकडून सत्कार
अखेर रिक्षा युनियन आणि वाहतूक विभाग पोलिसांनी पाटकर यांना ती बॅग घेऊन पोलीस ठाण्यात बोलावले. तसंच, वनिता यांनाही बोलावण्यात आलं आणि त्यांना दागिन्यांची बॅग परत केली. तेव्हा कुठे चिंतातूर वनिता खरात यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यांनी पोलिसांसह, त्या रिक्षाचालकाचेही आभार मानले.
दरम्यान प्रामाणिकपणा दाखवून बॅग परत केल्याप्रकरणी रिक्षा युनियन आणि पोलिसांनी रिक्षाचालकाचा, पाटकर यांचा सत्कार केला. 12 तोळे सोनं पाहूनही रिक्षाचालक पाटकर यांची नियत फिरली नाही त्यामुळे पाटकर यांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे बदलापूर शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
