Beed : चौथीतल्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकाकडून गैर कृत्य; पालकांनी चोप दिल्यानंतर गुन्हा दाखल…बीडमधला प्रकार
शहरातील नामांकित शाळेतील या प्रकारामुळे पालकवर्गात तीव्र संतापाची लाट असून या शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
बीड | शहरातील नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत (Girl Abuse) शिक्षकानी गैर वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा (Women Security) प्रश्न ऐरणीवर आलाय. प्रत्यक्ष पोलिसांनी (Beed police) घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून शिक्षकाविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शाहेदखान कासम पठाण असं या शिक्षकाचे नाव आहे. तो विज्ञान विषय शिकवीत होता. पीडित मुलीने पालकांना तक्रार करताच संतप्त नातेवाईकांनी शिक्षकाला शाळेत जाऊन जबर चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकारामुळे पालक वर्गात संताप व्यक्त होत असून शाळा व्यवस्थापनावरही ताशेरे ओढले जात आहेत.
शाळेतून सीसीटीव्ही गायब?
सर्वात नवाजलेल्या इंग्लिश शाळेत सीसीटीव्ही कार्यरत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या वर्गात विद्यार्थिनीशी गैरकृत्य सुरू होते तो वर्ग विज्ञान विषयाचा आहे. मात्र त्या वर्गात सीसीटीव्ही नसल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही नसल्याचा गैरफायदा घेत विकृत शिक्षकाने मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. याआधी आणखीन मुली या नराधम शिक्षकाचे सावज झाले असावेत का याचा तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. शिक्षकाच्या या कृत्याने खासगी शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
शिक्षकावर गुन्हा दाखल
शहरातील नामांकित शाळेतील या प्रकारामुळे पालकवर्गात तीव्र संतापाची लाट असून या शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
इतर बातम्या-