गुलाबी वादळाचा मराठवाड्याला तडाखा, शिवराज बांगर यांचा बीआरएसमध्ये प्रवेश, हैदराबादेत सोहळा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस या पक्षानं हळू हळू महाराष्ट्रात घुसखोरी सुरु केली आहे. एकानंतर एक नेते बीआरएसच्या गळाला लागत आहेत.
महेंद्रकुमार मुधोळकर, बीड : शिंदे- फडणवीस (Shinde Fadanvis) सरकार अस्तित्वात आल्यापासून राज्यात राजकीय घडमोडीला प्रचंड वेग आला आहे. अशातच तेलंगाणा (Telangana) राज्यात सत्तेत असलेला केसीआर यांचा पक्ष बीआरएस (BRS) मराठवाड्यात पाय रोवताना दिसत आहे. मराठवाड्यातील नुकत्याच नांदेड येथे झालेल्या विराट सभेत केसीआर यांनी शक्ती प्रदर्शन करत एक प्रकारे राज्यातील विविध राष्ट्रीय पक्ष आणि नेत्यांना आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना त्यांचा पक्ष राष्ट्रीय करायचा आहे. त्यामुळे त्यांनी तेलंगणा शेजारी असलेल्या महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात शिरकाव केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत ऊसतोड मजूर सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेला मराठवाड्यातून मोठा धक्का म्हटला जातोय.
हैदराबादेत सोहळा
शिवराज बांगर यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांचाही प्रवेश झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण गरम झाले आहे. हैद्राबाद येथे जाऊन के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. केसीआर यांचा बीआरएस पक्ष मराठवाड्यात मुसंडी मारताना दिसत आहे. शिवराज बांगर यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला आहे.
…म्हणून बीआरएस मध्ये बांगर यांचा प्रवेश
शिवराज बांगर हे मुळचे तसे शिवसेनेचे आहेत. मात्र त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. वंचित मध्ये एकोपा आणि एकनिष्ठता नसल्याने शिवराज बांगर हे टिकू शकले नाहीत. ते मनसेत दाखल झाले. मनसेतून ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी इच्छुक होते. वरिष्ठ नेत्यांशी बोलणं देखील झालं होतं. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी हिरवा झेंडा देखील दाखविला होता. मात्र अंतर्गत गटबाजीमुळे बांगर यांचा प्रवेश थांबविला गेला. अखेर बांगर आज बीआरएस मध्ये दाखल झाले आहेत.
याआधी बीआरएसमध्ये कोण कोण?
शिवराज बांगर यांच्याआधी नांदेड, संभाजीनगरातून महत्त्वाचे नेते बीआरएस पक्षात गेले आहेत. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, नांदेडचे शेतकरी चळवळीचे नेते शंकरअण्णा धोंडगे, यशपाल भिंगे आदींनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तेलंगणातील हा पक्ष महाराष्ट्रात नशीब आजमावून पाहणार, अशी चिन्ह आहेत. राज्यातील प्रमुख पक्षांच्या जीवघेण्या स्पर्धेत हा नवा पक्ष कितपत टिकू शकेल, याबद्दल शंका व्यक्त केली जातेय.