बीडमध्ये अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून, शरद पवार गटाचा नेता फरार, आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापलं
परळीत हत्येच्या आरोपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवार गटाचे नेते बबन गित्ते फरार झाले आहेत. त्यावरुन विविध आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. या प्रकरणी आता पोलीस तपासातून काय समोर येतं? हे पाहणं महत्वाचं असेल.
एका सरपंच्याच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातलं वातावरण पुन्हा तापलं आहे. हत्येच्या आरोपात असलेले शरद पवार गटाचे नेते बबन गित्तेंसह इतर 5 जण फरार झाले आहेत. दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राईड हँडनं बबन गित्तेंना अडकवल्याचा दावा आमदार रोहित पवार करत आहेत. तक्रारीनुसार 29 जूनला पैशांच्या वादातून हा सारा प्रकार घडला. अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे आणि त्यांचे सहकारी ग्यानबा गित्ते परळीतल्या बँक कॉलनी परिसरात आले. समोरच्या बाजूला बबन गित्तेंसह महादेव गित्ते हे त्यांचे सहकारी होते. पैशांचा विषय निघाल्यानंतर वाद सुरु झाला, आणि त्याचवेळी बबन गित्तेंनी बापू आंधळेंना गोळी मारली, असं फिर्यादीनं म्हटलंय.
या घटनेत सरपंच बापू आंधळेंचा मृत्यू तर त्यांचे सहकारी ग्यानबा गित्ते जखमी झाले. ग्यानबा गितेंच्याच फिर्यादीवरुन गुन्हा दाखल होताच बबन गित्तेंसह इतर 4 जण फरार झाले आहेत. तर त्यांचे दुसरे एक सहकारी महादेव गित्ते जखमी आहेत. बबन गित्ते, मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ निहरकर आणि राजेश वाघमोडे या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बबन गित्ते कोण आहेत?
गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल बबन गित्ते हे कधीकाळी गोपीनाथ मुंडेंचे सहकारी होते. नंतरच्या काळात ते धनंजय मुंडेंसोबत आले. परळी पंचायत समितीत त्यांच्या पत्नी उर्मिला गित्ते सभापती झाल्या. मात्र अविश्वास प्रस्ताव आणून त्यांच्या पत्नीची हकालपट्टी केली गेली, तेव्हापासून बबन गित्ते धनंजय मुंडेंपासून दुरावले. राष्ट्रवादी फुटीनंतर त्यांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केला. बीड लोकसभा निवडणुकीवेळी बूथ कॅप्चरिंग आरोप होत असताना अनेक ठिकाणी त्यांनी भेटी देत जाबही विचारला होता.
बीडमधील घटनांची मालिका चिंताजनक
तूर्तास आता पोलीस तपासातून काय समोर येतं? हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र गेल्या आठवड्याभरात बीडमधल्या विविध घटना चिंताजनक आहेत. 27 तारखेला दुपारी पंकजा मुंडेंविरोधात काम केल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिंदेंचे जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयाची मुंडे समर्थकांनी तोडफोड केली. त्यानंतर जरांगे पाटलांच्या मातोरी गावात दगडफेकीत दोन गट आमने-सामने आले, आणि 29 तारखेला बीड जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला.