Raj Thackeray | Loud Speakers च्या राजकारणावरून धर्मा-धर्मात दुही, भाजप खासदार प्रीतम मुंडेंची खंत
राज्यातील भोंग्यांच्या राजकारणावरून राज ठाकरे यांचं स्पष्ट नाव न घेता त्यांनी खंत व्यक्त केली. धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय हे चित्र निराशाजनक आहे, असं वक्तव्य भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी बीडमध्ये केलं.
बीड : राज्यभरात मशिदीवरील भोंगे (Loud Speakers) उतरवण्यासाठी एकिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे. भाजपनेदेखील मनसेच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. हनुमान जयंतीला भाजपच्या वतीनेही भोंग्यांचे वाटप करण्यात आले. मात्र भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील भोंग्यांच्या राजकारणावरून राज ठाकरे यांचं स्पष्ट नाव न घेता त्यांनी खंत व्यक्त केली. धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय हे चित्र निराशाजनक आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. बीडमध्ये आज पत्रकारांशी त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
विषमता अस्वस्थ करणारी- प्रीतम मुंडे
राज्यातील मशिदींवरील भोंगे 3 मेपर्यंत हटवले जावेत, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच सर्वच जिल्ह्यांतील मनसे कार्यकर्ते याबद्दल आक्रमक भूमिकेत आहेत. याविषयी बोलताना खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या, ‘ धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे. ज्याआधी आपल्या समाजात गुण्या गोविंदाने गोष्टी नांदत होत्या, त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधीना कधी राजकीय लोकांना सामोरे जावं लागणार आहे.’
राजेश टोपेंचं कौतुक
कोविड काळात राज्य सरकारने चांगले काम केलं, अशी प्रतिक्रियाही खासदार प्रीतम मुंडे यांनी दिली. राजकीय आरोप प्रत्यारोप वेगळा मुद्दा असतो. मात्र कोविड काळात महाराष्ट्रासारख्या देशातील एका मोठ्या राज्यात आरोग्य व्यवस्थेवर संकट होतं. मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या तसेच स्थलांतरीत मजुरांचा येथे प्रश्न असतानाही महाराष्ट्र सरकारने चांगली कामगिरी केली, अशी प्रतिक्रिया प्रीतम मुंडे यांनी दिली.
भोंग्यांवरून नाशिक पोलिस आयुक्तांचे काय आदेश?
राज्यात भोंग्यांवरून धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता पाहता, नाशिक पोलीस आयुक्तांनी नवे निर्देश जारी केले आहेत. नाशिक शहरातील सर्व धार्मिक स्थळांनी आणि इतरांनीही येत्या 03 मे पर्यंत भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यावी. अन्यथा कडक कारवाई करून हे भोंगे काढले जातील. मशीद, मंदिर, गिरीजाघर, चर्च, गुरुद्वारा सर्वच धार्मिक स्थळांसाठी हे आदेश लागू आहेत. त्यांनी आपल्या प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यासाठी परवानगी घेतली नसेल, तर घ्यावी. आवाजाच्या पातळीची मर्यादा पाळावी, असे आदेश नाशिक पोलील आयुक्तांनी दिले आहेत.
इतर बातम्या-