धनंजय देशमुख बीड पोलीस ठाण्यात का गेले? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवी अपडेट
बीडच्या केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराड फरार आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज बीड पोलिसांना भेटून तपासाची माहिती घेतली. त्यांनी सीआयडीकडून लवकरच आरोपीची अटक होईल, असा विश्वास व्यक्त केला. धनंजय यांनी आपल्या भावाला न्याय मिळेपर्यंत लढा देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता 22 दिवस झाले आहेत. पण तरीही या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड फरार आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. सीआयडीकडून आतापर्यंत वाल्मिक कराडच्या संपर्कात असलेल्या आतापर्यंत 100 पेक्षा जास्त जणांची चौकशी झाली आहे. या दरम्यान आज महत्त्वाची घडामोड घडली. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आज बीड पोलीस ठाण्यात पोहोचले. तपास कुठपर्यंत आला? याची माहिती घेण्यासाठी ते स्वत:हून पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी एका अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यानंतर ते पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“आम्ही गुजर साहेबांना दोन मिनिट भेटलो. आम्ही आल्यापासून बसलो होतो. ते चौकशीसाठी बाहेर गेले होते. ते आल्यानंतर त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही केजला या. चौकशी कुठपर्यंत आली ते सांगू. सीआयडी कार्यालयात ज्योती जाधव नावाच्या महिलेची चौकशी सुरु आहे. आम्ही स्वत:हून आलो होतो. आम्ही गुजर साहेबांना भेटलो. जास्त काही बोलणं झालं नाही. आम्ही उद्या सविस्तर भेटणार आहोत. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की, एक-दोन दिवसांत आरोपीला अटक होईल”, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.
‘मी तुम्हाला काहीच चुकीचं बोललो नाही’
“मी नाराज यासाठी आहे की, आईची तब्येत खराब आहे. घटनेला 20 दिवस झाले. मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही जे काम करत आहात त्यावर मी तुम्हाला काहीच चुकीचं बोललो नाही. मी दररोज येणाऱ्या लोकांशी बोलतोय, प्रसारमाध्यमांशी रोज बोलतोय. अनेक लोक सांत्वनासाठी येत आहेत. त्यांच्याशी बोलतोय. कारण ते सांत्वनासाठी येत आहेत. आपण त्यांनाच बोललो नाही तर त्यांना आपण बोललो नाही, असं वाटायला नको. हे काम सातत्याने सुरु आहे त्यामुळे तुम्हाला नाराज चेहरा दिसत आहे”, असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं.
‘आम्हाला उद्या सर्व माहिती कळेल’
“मी सीडीआरबद्दल विचारलं. त्यांनी आपण उद्या सांगतो, असं सांगितलं. याबाबत उद्या सविस्तर बोलतो. आम्ही उद्या सीआयडीच्या टीमकडून माहिती घेणार आहोत. त्यानंतर मी तुमच्यासोबत बोलेन. कारण अर्धवट माहिती घेऊन आज बोललो तर ते चुकीचं होईल. आम्हाला उद्या सर्व माहिती कळेल तेव्हा माहिती घेऊन तुम्हा सर्वांना मी सांगेन. मी तुमच्यापासून कुठेही दूर गेलेलो नाही. माझी एक विनंती आहे की, मी आतापर्यंत असं म्हटलो आहे, माझ्या भावाच्या हत्येत जे कुणी सहआरोपी आहेत त्यांना शंभर टक्के शिक्षा व्हायला पाहिजे. मी न्याय घेतल्याशिवाय मागे सरकणार नाही”, अशी देखील प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.