बळ दे पखांना, झाडा-फुला-पानांना, समाजाला अनोखा संदेश देत लेकीचा आगळा वेगळा वाढदिवस, बीडच्या निसर्गप्रेमीचं मोठ्ठं गिफ्ट!
बीडमधल्या निसर्गप्रेमीनं आपल्या लेकीचा, सर्पराज्ञीचा वाढदिवस अगदी वेगळ्या पद्धतीनं साजरा केला. सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे या दाम्पत्याच्या लेकीचा सर्पराज्ञी हिच्या दहाव्या वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन सध्या खूप चर्चेत आहे.
बीडः निसर्गावर जीवापल्याड प्रेम करणारा बीडमधील सिद्धार्थ सोनवणे. उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा वृक्षांसहित वन्य प्राण्यांना आपल्या घरातल्या पिला-बाळांप्रमाणं जीव लावत जपणाऱ्या सिद्धार्थचं जग खूप वेगळंय. शिरुर तालुक्यातील तागडगाव इथं तर त्यानं सर्पराज्ञी नावानं वन्यजीवांची हक्काची सृष्टीच जणू वसवलीय. याच सृष्टीत त्यानं नुकताच आपल्या लेकीचा, सर्पराज्ञीचा वाढदिवस अगदी वेगळ्या पद्धतीनं साजरा केला. सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे या दाम्पत्याच्या लेकीचा सर्पराज्ञी हिच्या दहाव्या वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन सध्या खूप चर्चेत आहे.
80 प्रजातींच्या वृक्षांची तुला
सर्पराज्ञीचा जन्मोत्सव अगदी वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचा, असं सोनवणे दाम्पत्यानं ठरवलं. यावेळी 80 प्रजातींच्या वृक्षांची बीजतुला करण्यात आली. यात सामान्यपणे आढळणार्या तसेच दुर्मिळ अति दुर्मिळ सोनसावर, कौशी, वायवर्ण, निर्मली, लाल हादगा, कोशिंब, बिबवा, काटेसावर, पांढरा पांगारा, पिवळा पळस, ताम्हण, तांबडा कुडा, आदीवृक्षांचा बियांचा वापर करण्यात आला. वृक्षतुला करून सर्पराज्ञीच्या हस्ते बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. तसेच सोनवणे दाम्पत्यानं उपचार करून बऱ्या केलेल्या वन्यजीवांना पुन्हा आदिवासात सोडण्यात आले. यावेळी सायंकाळी सर्पराज्ञीच्या हस्ते सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचारानंतर पूर्ण बरे झालेल्या व निसर्गात जगण्यास समर्थ असलेले उदमांजर,काळवीट व कोकिळेस निसर्गात सोडून देण्यात आले.
अखंड अविरत वन्यजीव रक्षणाचा वसा
सोनवणे दाम्पत्याने शिरूर तालुक्यातील तागडदाव इथं सर्पराज्ञी वन्यजीवन पुनर्वसन केंद्र स्थापन केलं आहं. जिल्ह्यातील माळरानावर सापडणारे जखमी प्राणी, पक्षी यांच्या सुश्रुषेपासून पुनर्वसनापर्यंत सर्व जबाबदारी हे दाम्पत्य घेते. कमी वृक्षसंपदा असली तरी बीडमध्ये अनेक दुर्मिळ प्रजातीचे वन्यजीव आढळतात. एखादा प्राणी, पक्षी जखमी झाला आणि सानवणे दाम्पत्याकडे त्याची घरच्या माणसाप्रमाणं सुश्रुषा केली जाते आणि बरं झाल्यावर त्याला निसर्गातच मोकळं सोडून दिलं जातं. अशा या निसर्गप्रेमीनं लेकीचा अनोख्या पद्धतीनं साजरा केलेला वाढदिवसही समाजाला संदेश देणारा ठरलाय.
इतर बातम्या-