Pankaja Munde | पंकजा मुंडे अडचणीत! वैद्यनाथ साखर कारखान्याची लागणार बोली
Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे या अडचणीत आल्या आहेत. त्यांच्या ताब्यातील वैद्यनाथ साखर कारखान्याचा लिलाव होणार आहे. 203 कोटींच्या कर्ज वसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 25 जानेवारी रोजी कारखान्याचा लिलाव असल्याचा उल्लेख यासंबंधीच्या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
महेंद्र मुधोळकर, प्रतिनिधी, बीड | 10 जानेवारी 2024 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. त्या अध्यक्ष असलेल्या परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्यात आला आहे. वैद्यनाथ कारखान्यावरील थकीत कर्जापोटी युनियन बँकेने आता लिलावासाठी नोटीस दिली आहे. कारखान्याकडे तब्बल 203 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. त्या पोटी कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने केला जाणार आहे. यासाठीची प्रक्रिया 25 जानेवारी रोजी होईल. नोटीस मध्ये वैद्यनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाची नावे आहेत. दरम्यान यापूर्वीच पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी विभागाने पण दंड ठोठावला होता. यानंतर आता ही कारवाई झाल्याने कारखाना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
19 कोटींच्या थकबाकीसाठी जीएसटीची नोटीस
काही दिवसांपूर्वी जीएसटी विभागाने वैद्यनाथ साखर कारखान्याला 19 कोटींच्या थकबाकीसाठी नोटीस बजावली होती. त्यावेळी मोठी चर्चा झाली. कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी लोकचळवळीतून 19 कोटींची थकबाकी देण्याची तयारी केली होती. त्याला पंकजा मुंडे यांनी नकार दिला होता. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. 9 कारखान्यांना केंद्राकडून मदत मिळाली, पण आपल्या कारखान्याला यादीतून बाहेर ठेवल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
आता बँकेकडून लिलाव
वैद्यनाथ कारखान्याकडील थकीत कर्जाप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील युनियन बँक ऑफ इंडियाने लिलावाची प्रक्रिया सुरु केली आहे. 20 एप्रिल 2021 रोजीपासून कारकान्याकडे 203 कोटी 69 लाख रुपयांचे कर्ज थकले आहे. आता व्याजसहित हे कर्ज वसुलसाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान ऑनलाईन पद्धतीने कारखान्याचा लिलाव होणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे लक्ष
पंकजा मुंडे यांनी यापूर्वीच जीएसटी आणि ईडीच्या नोटीसवेळी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता थेट कारखानाच लिलाव काढण्यात येणार असल्याची नोटीस येऊन धडकली आहे. हा पंकजा मुंडे यांना धक्का मानण्यात येत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.