भाजपला मोठा झटका, मराठा आरक्षणासाठी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा
मराठा आरक्षणासाठी आता लोकप्रतिनिधींचं राजीनामा सत्र सुरु झालंय. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचेच लोकप्रतिनिधी आता राजीनामा देत आहेत. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची बातमी ताजी असताना असताना आणखी एका बड्या नेत्याने राजीनामा दिलाय.
बीड | 30 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण आता चांगलंच तापताना दिसत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती आता खालावत चालली आहे. त्यांनी सरकारला चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. पुढचे एक-दोन दिवस आपल्याला बोलता येईल त्यावेळेत लवकर चर्चेसाठी या, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. जरांगे यांनी उपचार घेण्यासही नकार दिला आहे. तर दुसरीकडे राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. या कार्यर्त्यांकडून ठिकठिकाणी नेतेमंडळींना काळे झेंडे दाखवले जात आहेत. असं असताना आता बीड जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलाय.
मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांची याबाबतची फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्पिलदेखील व्हायरल झालीय. त्यानंतर आता लोकप्रतिनिधींचं मराठा आरक्षणासाठी राजीनामासत्र सुरु झालं आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदार-खासदारांकडूनच राजीनामे सुरु झाले आहेत. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी काल मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला होता. हेमंत पाटील यांच्या राजीनाम्याची बातमी ताजी असतानाच आता बीडमध्ये भाजप आमदाराने राजीनामा दिलाय.
भाजप आमदाराचा राजीनामा
बीडच्या गेवराई मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. “महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. या मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे”, असं लक्ष्मण पवार विधानसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले आहेत.
अजित पवार गटाच्या आमदाराच्या बंगल्याची जाळपोळ
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची मराठा कार्यकर्त्यांनी जाळपोळ केल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याच्या परिसरात तोडफोड केली. त्यानंतर त्यांची गाडी आणि बंगला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओदेखील समोर आलाय.